पुणे : सदाशिव पेठेतील शनीपार चौकाजवळ असलेल्या रमेश डाईंग या ऑल-सीझन कपडे व सामानाच्या दुकानाला सोमवारी (दि. ९) दुपारी ११.५२ वाजता अचानक भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच पुणे महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने तातडीने १० अग्निशमन बंब व एक हायड्रॉलिक प्लॅटफॉर्म घटनास्थळी रवाना केले. घटनास्थळी पोहोचताच अग्निशमन जवानांना दुकानाच्या टेरेसवर असलेलेल्या पञ्याच्या शेडमध्ये व सोलर पॅनलजवळ प्रचंड आग आणि धुराचे लोट दिसले. जवानांनी तात्काळ बीए सेट लावून आगीच्या केंद्रस्थानी प्रवेश केला आणि कोणी कर्मचारी किंवा व्यक्ती आत अडकली आहे का याची तपासणी करत आग विझवण्यास सुरुवात केली. आगीचे नेमके ठिकाण गाठणे कठीण जात असल्याने शेजारच्या शहा ब्रदर्स या दुकानातील पञे काढून तेथून पाण्याचा मारा करण्यात आला. आग खाली दुकानात पसरणार नाही याची विशेष काळजी घेत जवानांनी अवघ्या एक तासात आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याची घटना घडली नाही. मात्र दुकानातील स्वेटर, रेनकोट, शालेय बॅगा, सूटकेस आणि इतर मौल्यवान साहित्य मोठ्या प्रमाणात जळून नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. अग्निशमन दलाच्या कसह कसबा, जनता व एरंडवणे स्थानकातील बंब, वॉटर टँकर तसेच हायड्रॉलिक प्लॅटफॉर्म घटनास्थळी दाखल झाले होते. अग्निशमन अधिकारी विजय भिलारे, पंकज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे ५० जवानांनी शर्थीचे प्रयत्न करीत आग आटोक्यात आणली. यावेळी पुणे पोलिस, महावितरण विभाग, स्थानिक नागरिक आणि १०८ रुग्णवाहिकेचे मौल्यवान सहकार्य लाभले.