आळंदी – मरकळ (ता. खेड) येथील गादी कारखान्याला आज शुक्रवारी (दि. 3) सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत 2 ट्रक, 1 पीक अपसह इतर साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. अडीच तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर अग्नीशमन दलाने आगीवर नियंत्रण आणले. सदर कारखाना जयसिंग रामभाऊ लोखंडे (रा. मरकळ) यांचा असल्याचे सांगण्यात येत आहे. आगीच्या घटनेची वर्दी प्राप्त होताच तात्काळ आळंदी नगरपरिषद अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल होऊन आग विझविण्याचे कार्य सुरू झाले. परंतु लागलेली आग मोठ्या प्रमाणावर असल्याने पुढील अर्ध्या तासात PMRDA आणि PCMC यांच्या अग्निशमन दलाच्या गाड्या देखील घटनास्थळी पोहोचल्या. साधारण 2:30 तासांच्या प्रयत्ना नंतर आगीवर पूर्णपणे नियंत्रण आणण्यात आले. आग विझवण्याचे कार्य सुरू असताना कारखान्यात असलेल्या LPG gas cylinder सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आल्याने स्फोट होण्यापासून अटकाव झाला. गादी कारखान्या शेजारी उभ्या असलेल्या 2 ट्रक,1 पीक अप पूर्णपणे जळाले असून कारखान्याचे देखील मोठे नुकसान झाले आहे. आगीचे कारण अद्याप समजलेले नाही. आळंदी पोलीस पुढील तपास करत आहेत.