दिल्लीतील रोहिणी भागात भीषण स्फोट; ‘ते पावडर’ सापडल्याने मोठ्या कटाचा संशय…

Delhi । दिल्लीतील रोहिणी नगरच्या प्रशांत विहार भागात रविवारी सकाळी झालेल्या स्फोटामुळे राजधानी दिल्ली येथे एकच खळबळ उडाली. सकाळी 7:30 वाजता CRPF शाळेजवळ झालेल्या या स्फोटाने नागरिकांची घाबरगुंडी उडाली. स्फोटानंतर परिसरात धुराचे मोठे लोट पसरले, तीव्र दुर्गंधी पसरली आणि गाड्या, घरांच्या काचा फुटल्या. सुदैवाने या स्फोटात कोणतीही जीवितहानी किंवा मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे नुकसान झाले नाही.
स्फोटाची प्राथमिक तपासणी
घटनेच्या माहितीमुळे अनेक तपास यंत्रणा सक्रिय झाल्या. NSG, दिल्ली पोलिस, FSL (फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी) आणि अग्निशमन दलाच्या टीम्सने घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. या स्फोटामुळे कोणत्याही घातक वस्तू आढळल्या नसल्या तरी, घटनास्थळी ‘सफेद पावडर’च्या स्वरूपात काही अवशेष आढळले आहेत. यामुळे हा स्फोट कुठल्यातरी मोठ्या कटाचा भाग तर नाही ना? असा संशय व्यक्त केला जाऊ लागला आहे.
दिल्ली पोलिसांची तपासणी सुरू
स्फोटाच्या तीव्रतेमुळे आणि सापडलेल्या अवशेषांमुळे, पोलिसांनी या घटनेला अधिक गांभीर्याने घेतले आहे. दिल्ली पोलिसांनी तातडीने फॉरेन्सिक तज्ज्ञांना बोलावून तपास सुरू केला. स्फोटाचे नेमके कारण अजून स्पष्ट झालेले नाही, मात्र स्फोटामागे दहशतवादी कारवाई किंवा कट असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांनी या प्रकरणात स्फोटक कायद्यांतर्गत FIR नोंदवली आहे.
अधिक तपासासाठी सीसीटीव्ही फुटेजची मदत
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने घटनास्थळी तपास सुरू केला असून, स्फोटाच्या आसपास असलेल्या सीसीटीव्ही फुटेजची चाचणी घेतली जात आहे. त्याचबरोबर एंटी-टेरर युनिटने देखील तपासाची जबाबदारी घेतली आहे. या घटनेमुळे दिल्लीत हल्ल्याचा मोठा कट असल्याच्या चर्चेला उधाण आले असून पोलिस अधिकाऱ्यांकडून प्रत्येक शक्यता तपासली जात आहे.
सिलेंडर ब्लास्ट की काही वेगळं?
हा स्फोट सिलेंडर ब्लास्टमुळे झाला असू शकतो. अशीही शक्यता आहे. मात्र, स्फोटाच्या तीव्रतेमुळे तो साधारण सिलेंडर स्फोट नव्हता, असे दिसते. घटनास्थळावर सापडलेल्या अवशेषांच्या आधारे, तपास यंत्रणा या घटनेची सखोल चौकशी करत आहेत.





