प्रभात वृत्तसेवा पिंपरी – पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीत गेल्या काही काळात विविध स्वरूपाचे गंभीर गुन्हे करणाऱ्या संघटीत गुन्हेगारी टोळ्यांविरोधात मोकाची कारवाई करीत पोलिसांनी निर्णायक पावले उचलले आहे. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी विशेष सूचना दिल्यानंतर जुलै २०२५ महिन्यात विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल झालेल्या १३ गंभीर गुन्ह्यांमध्ये एकूण ५७ आरोपींविरुद्ध महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोका) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या टोळ्यांनी खून, खुनाचा प्रयत्न, अंमली पदार्थ विक्री, जबरी चोरी, खंडणी, अपहरण, बलात्कार, घातक शस्त्र बाळगणे, दहशत निर्माण करणे, फसवणूक, बनावट कागदपत्रे वापरणे, घरफोडी, दरोडे, वेश्याव्यवसायास प्रवृत्त करणे, वाहनांची तोडफोड-जाळपोळ यांसारखे गंभीर गुन्हे केले असून त्यांच्यावर एकूण ११४ गुन्ह्यांची गुंतलेली नोंद झाली आहे.अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड यांनी आरोपींविरुद्ध महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अंतर्गत मोकाची कारवाई केली आहे. हिंजवडी, चिंचवड, चिखली, देहूरोड, बावधन, चाकण, सांगवी, दिघी, संत तुकारामनगर, महाळुंगे एमआयडीसी, एमआयडीसी भोसरी अशा वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत असलेल्या १३ टोळी प्रमुख व त्यांचे ५७ साथीदार यांना ओळख पटवून तपासाअंती मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.या कारवाईमुळे गुन्हेगारी टोळ्यांचा बिमोड होऊन गुन्हेगारी घटनांमध्ये लक्षणीय घट होण्याची शक्यता असून, स्थानिक नागरिकांमध्ये पोलीस दलाबद्दल विश्वास निर्माण झाला आहे. मागील वर्षातही अशाच प्रकारे मोका अंतर्गत करण्यात आलेल्या कारवाईमुळे गुन्हेगारी घटली होती.