मस्साजोगच्या ग्रामस्थांचे आजपासून अन्नत्याग आंदोलन; मागण्यांची दखल न घेतल्यास पाणी त्यागही करण्याचा इशारा

Santosh Deshmukh Case | मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सात आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली. मात्र या प्रकरणातील कृष्णा आंधळे या आरोपीचा दोन महिने उलटून गेले तरीही अद्याप शोध लागलेला नाही. याप्रकरणीमस्साजोगचे ग्रामस्थ आक्रमक झाले असून या प्रकरणातील आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यासाठी विविध मागण्यांसह आज सकाळी १० वाजल्यापासून अन्नत्याग आंदोलन करणार आहेत.
आमच्या मागण्यांची जर दोन दिवसात दखल नाही घेतली तर पाणी सुद्धा पिणार नाही असा इशारा ग्रामस्थांकडून देण्यात आला आहे. तसेच शिष्टमंडळाने दखल घेतली तर आंदोलन मागे घेऊ, असेही गावकऱ्यांनी सांगितले आहे. गावकऱ्यांनी अन्नत्यागाचा पावित्रा घेतला आहे त्याच्याशी मी सहमत आहे. जोपर्यंत शिष्टमंडळ येत नाही आम्हाला आश्वासन देत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहिल, असे धनंजय देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. Santosh Deshmukh Case |
मस्साजोग ग्रामस्थांच्या मागण्या कोणत्या?
– फरार आरोपी कृष्णा आंधळेला लवकरात लवकर अटक करून त्याला कठोर शिक्षा द्यावी.
– या प्रकरणात सरकारी वकील म्हणून उज्जवल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी
– केजचे तत्कालीन पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन व पोलिस उपनिरीक्षक राजेश पाटील यांना बडतर्फ करुन सहआरोपी करण्यात यावे.
– संतोष देशमुख हत्या प्रकरण जलदगती न्यायालयात चालवावे.
– वाशी पोलीस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक घुले, पो.कॉ. दिलीप गित्ते, गोरख व दत्ता बिक्कड, हेड कॉ. यांचे सीडीआर तपासून यांना सहआरोपी करण्यात यावे.
– आरोपींना फरार होण्यास मदत करणारे बालाजी तांदळे, संजय केदार, सारंग आंधळे,संभाजी वायबसे यांची चौकशी करुन यांना तात्काळ सहआरोपी करावे.
– घटना घडल्यानंतर संतोष देशमुख यांचा मृतदेह केज रुग्णाण्यात नेण्याऐवजी पोलिस उपनिरीक्षक राजेश पाटील यांनी कळंबकडे कोणाच्या सांगण्यावरून नेला होता, याची चौकशी केली जावी.
दरम्यान, मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येनंतर त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा म्हणून मस्साजोगचे ग्रामस्थ लढा देत आहेत. याच पार्श्वभूमीवर आजपासून संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमूख आणि मस्साजोगचे गावकरी अन्नत्याग आंदोलन करणार आहेत.





