Santosh Deshmukh : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग ग्रामपंचायत सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत धक्कादायक निकाल लागला आहे. दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा पराभव करत स्वरूपानंद देशमुख यांनी ९२ मतांनी विजय मिळवला आहे. या निकालामुळे संपूर्ण जिल्ह्यात चर्चेला उधाण आले आहे. (Santosh Deshmukh) संतोष देशमुख यांच्या ९ डिसेंबर २०२४ रोजी झालेल्या हत्येनंतर सरपंचपद रिक्त झाले होते. त्यानंतर ही पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली. निवडणुकीत अश्विनी देशमुख आणि स्वरूपानंद देशमुख यांच्यात थेट लढत झाली. भावनिक वातावरणात पार पडलेल्या या निवडणुकीत अखेर मतदारांनी विकासाच्या मुद्द्याला प्राधान्य दिल्याचे दिसून आले. (Santosh Deshmukh) सुरुवातीला ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी देशमुख कुटुंबीयांची अपेक्षा होती. मात्र अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी काही उमेदवारांनी माघार घेतली, तर स्वरूपानंद देशमुख यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय कायम ठेवला. मागील निवडणुकीत अवघ्या ९ मतांनी पराभूत झालेल्या स्वरूपानंद देशमुख यांनी यावेळी मोठ्या फरकाने विजय मिळवला. (Santosh Deshmukh) प्रचारादरम्यान अश्विनी देशमुख यांच्या समर्थनार्थ त्यांची मुलगी वैभवी आणि मुलगा विराज यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. या निवडणुकीत भावनिक वातावरण निर्माण झाले होते. २८ एप्रिल रोजी मतदान पार पडले, तर २९ एप्रिल रोजी मतमोजणीनंतर निकाल स्पष्ट झाला. (Santosh Deshmukh) दरम्यान, अश्विनी देशमुख यांच्या पराभवानंतर धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया देत पराभव स्वीकारला आणि नवनिर्वाचित सरपंचाला शुभेच्छा दिल्या. गावाच्या विकासासाठी पुढेही सहकार्य करण्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. संतोष देशमुख यांच्या गावविकासाच्या दृष्टीकोनावर काम सुरू ठेवणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. ती तुझी बहीण होती ना? निकालानंतर स्वरूपानंद देशमुख यांनी देशमुख कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी संतोष देशमुख यांच्या आईने भावनिक प्रतिक्रिया देत निवडणुकीनंतर झालेल्या जल्लोषावर नाराजी व्यक्त केली. “ती तुझी बहीण होती ना?” असा उद्विग्न सवाल केला. घरातील दुःखाच्या पार्श्वभूमीवर जल्लोष योग्य होता का, असा प्रश्न उपस्थित करत आईने संताप व्यक्त केला. या घटनेमुळे परिसरात भावनिक आणि राजकीय वातावरण तापले आहे. (Santosh Deshmukh)