बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात रोज काहीतरी घडामोडी समोर येताना दिसत आहेत. मृत संतोष देशमुख यांना न्याय मिळावा म्हणून संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि गावकऱ्यांनी कालपासून अन्नत्याग आंदोलन पुकारले होते. आज भाजपचे आमदार सुरेश धस यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. त्यानंतर मस्साजोग येथील आंदोलनाला तात्पुरत्या स्वरूपात स्थगित देण्यात आली आहे. बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणाला दोन महिने उलटूनही मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे. पोलिसांचा तपास संथ असून आरोपींना सहकार्य करणाऱ्यांवरही कारवाई झालेली नाही. त्यामुळेच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि मस्साजोगचे गावकऱ्यांनी मागील दोन दिवसांपासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केलं होतं. आंदोलन स्थगित धनंजय देशमुख यांनी मागील २४ तासांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केलं होतं. आज बुधवारी दुपारी भाजप आमदार सुरेश धस यांनी मस्साजोग इथं जाऊन आंदोलन स्थळी भेट दिली. गावकऱ्यांशी चर्चा केली. मुख्यमंत्री यांना गावकऱ्यांच्या मागण्या संदर्भात पत्र दिले होते. त्यानंतर गावकऱ्यांनी सहमतीने आंदोलन तुर्तास स्थगिती करण्याचा निर्णय घेतला. सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात महाराष्ट्र सरकारतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून, तर अॅड. बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे.