Crime News : नगरमध्ये मस्साजोगची पुनरावृत्ती ! चेंबरमध्ये कोंबून तरुणाची अमानुष मारहाण करून हत्या

अहिल्यानगर : बीड जिल्ह्याच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची काही दिवसांपूर्वी आरोपींकडून अमानुषपणे मारहाण करून हत्या करण्यात आली होती. या हत्येचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. या हत्या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली होती. ही घटना ताजी असताना आता अहिल्यानगर मध्ये देखील अशाच प्रकारची घटना घडली आहे.
काय घडले नेमके?
वैभव नायकोडी असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. २२ फेब्रुवारी रोजी सकाळी त्याचं अपहरण करण्यात आलं होतं. यानंतर त्याची आरोपींनी बेदम मारहाण करून हत्या केली आहे. धक्कादायक म्हणजे वैभवचं अपहरण होण्याआधी २१ फेब्रुवारीला संदेश वाळुंज नावाच्या तरुणाचं अपहरण करण्यात आलं होतं. आरोपींनी संदेशला त्याच्या घराजवळून उचललं होतं.
यानंतर अपहरणकर्त्यांनी संदेशला अहिल्यानगर एमआयडीसी परिसरातील गरवारे चौकात घेऊन जात बेदम मारहाण केली होती. त्यानंतर त्याला एका निर्जनस्थळी घेऊन जात, चेंबरमध्ये घालून मारहाण करण्यात आली. आरोपींनी या मारहाणीचे व्हिडीओ काढले. तसेच त्याला एका फ्लॅटमध्ये रात्रभर डांबून ठेवले. संदेशच्या अपहरणाच्या दुसऱ्या दिवशी संदेशच्या फोनवर वैभव नायकोडीचा मेसेज आला होता.
हा मेसेज आरोपींना पाहिल्यानंतर त्यांनी वैभवला देखील तपोवन रोडवरील एका रुग्णालयाजवळ बोलवून घेतलं. वैभव त्याठिकाणी आला असता आरोपींनी त्याचंही अपहरण केलं. त्यानंतर आरोपी दोघांनाही पुन्हा त्याच निर्जनस्थळी घेऊन गेले. इथं गटारीसाठी बांधलेल्या चेंबरमध्ये घालून दोघांना बेदम मारहाण केली. पुन्हा दोघांना एका फ्लॅटमध्ये डांबून ठेवले.
मारेकऱ्यांनी दोघांना मॅगी देखील खायला दिली. पण आरोपींनी दिलेली मॅगी आरोपीनं खाण्यास नकार दिला. यामुळे आरोपींनी पुन्हा वैभवला मारहाण केला. ही मारहाण इतकी भयंकर होती की, यात वैभवचा मृत्यू झाला. यानंतर आरोपींनी वैभवचा मृतदेह नगर मनमाड रस्त्यावरील विळदघाट येथील केकताईच्या डोंगरात नेत जाळून टाकला. तसेच या घटनेची वाच्यता कुठेही करू नको, अशी धमकी देऊन संदेशला सोडून दिले.
आरोपींच्या तावडीतून सुटल्यानंतर पोलिसांनी सगळी हकीकत सांगितली. यानंतर पोलिसांनी ९ जणांविरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पोलिसांनी खोलात जाऊन तपास केला असता, जुन्या वादातून ही हत्या झाल्याचं समोर आलं आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.





