एनआयएचे 13 हजार पानी आरोप पत्र दाखल – आणखी एका हल्ल्याचा कट बारगळला
नवी दिल्ली – जैश- ए- महंमद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या आणि पाकिस्तानस्थित दहशतवादी मसूद अझर हा पुलवामा हल्ल्याचा सूत्रधार होता. त्यात त्याला रौफ अझहर आणि मौलाना महंमद अम्मर यांची साथ मिळाल्याचा आरोप राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या पथकाने ठेवला आहे.
याबाबत 13 हजार पानांचे आरोपपत्र जम्मूच्या विशेष न्यायलयात मंगळवारी सादर करण्यात आले. त्यात मसूद अझहरचा भाचा महंमद उमर फारूक याला या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार ठरवण्यात आले आहे. तो भारताचे विमान अपहरण करणारा इब्राहीम अझहर याचा मुलगा आहे.
केंद्रीय राखीव दलाच्या पथकावर हल्ला करण्यापुर्वी, हल्ला करत असताना आणि त्यानंतर जैशच्या नेतृत्वाच्या संपर्कात असल्याचे पुरेसे पुरावे असल्याचे एनआयएने आपल्या आरोपपत्रात म्हटले आहे. या हल्ल्यात 40 जवान शहीद झाले होते.
या प्रकरणाचा तपास पूर्ण होण्यासाठी एनआयएला 18 महिन्यांपेक्षा अधिक काळ लागला. मात्र या प्रकरणाशी संबंधित शास्त्रीय आणि डिजिटल पुरावे उपलब्ध असल्याचा विश्वास एनआयएने व्यक्त केला. कॉल रेकॉर्डिंग, व्हॉटस ऍप चॅट, पिक्चर आणि व्हिडिओ आरोपींच्या मोबाइरलमधुन जप्त करण्यात आलेआहेत.