नवी दिल्ली – करोना बचावासाठी वापरले जात असलेले सिंगल युज मास्क आणि पीपीई किट जगासमोर मोठी समस्या बनली आहे. कोट्यावधींच्या संखेने या वस्तू वापरल्या जात आहेत पण त्याच्या सुरक्षित विल्हेवाटीसाठी पुरेशी व्यवस्था नाही. त्यामुळे जगभरातील समुद्र किनारे, नद्या आणि जमिनीवर हे वापरले मास्क, पीपीई किट ढिगाने पडलेले दिसत आहेत.
बुधवारी न्यूजर्सी येथील क्लीन ओशन एन्व्हायर्नमेंट ग्रुपने फेकल्या गेलेल्या वस्तूंची यादी सादर केली आहे. त्यात सिगरेट, प्लॅस्टिक, खाद्य पदार्थ पॅक यांच्या बरोबरच मोठ्या संखेने मास्क आहेत. पीपीई किट आणि मास्कच्या वापराने करोनाचा धोका कमी होतो हे खरे असले तरी दुसरीकडे हे फेकून दिलेले मास्क आणि किट समुद्राच्या पाण्यात जात असल्याने समुद्री जीवन धोक्यात आले आहे.
डिस्पोजेबल म्हणून विकले जात असलेले हे मास्क आणि पीपीई किट सिंगल युज प्लॅस्टिक सारखेच काम करत आहेत. ते पूर्ण नष्ट होत नाहीत तर त्याचे छोटे तुकडे दीर्घकाळ तसेच पडून राहतात. त्यामुळे पर्यावरणाला गंभीर धोका निर्माण झाला आहे.