Masap: मसापमधील वादाचा शंभराव्या साहित्य संमेलनावर परिणाम नाही
Masap:

संमेलन निमंत्रक राजेश पांडे यांची माहिती
Masap: महाराष्ट्र साहित्य परिषदेतील अंतर्गत वादाचा आगामी शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनावर कोणताही परिणाम होणार नाही.
तसेच, राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता हे संमेलन लोकसहभागातून साधेपणाने पण साहित्यिकदृष्ट्या दर्जेदार पद्धतीने पार पाडण्यात येईल, असे संमेलनाचे निमंत्रक राजेश पांडे यांनी सांगितले.
पुणे पुस्तक महोत्सवाच्या मंडप उभारणीच्या शुभारंभानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपाली भूमिका मांडली. पांडे म्हणाले की, साहित्य संमेलनाचे नियोजन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीत निश्चित झाले असून, आयोजनाची जबाबदारी समर्थ युवा फाउंडेशनकडे सोपविण्यात आली आहे.
त्यानुसार कामास सुरुवातही झाली आहे. साहित्य आणि संस्कृतीच्या क्षेत्रात पक्षीय किंवा सत्तेचे राजकारण येऊ नये. मसापच्या विश्वस्त मंडळातील वादाचे निराकरण धर्मादाय आयुक्त करतीलच, मात्र संमेलनाच्या तोंडावर हे वाद समोपचाराने मिटवावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, या संमेलनासाठी राज्य सरकारने पाच कोटी रुपयांचे अनुदान जाहीर केले आहे. हा शासकीय निधी दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी वापरण्याचा आमचा मनोदय असून, याबाबत साहित्य महामंडळाशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

