नवी दिल्ली – मारुती सुझुकी कंपनीचा गुजरातमध्ये प्रकल्प आहे. मात्र मागणी वाढत आहे. अशा परिस्थितीत या प्रकल्पाचे विस्तारीकरण करावे लागणार आहे. याकरिता जमीन उपलब्ध करण्यासाठी आणि इतर कामासाठी मारुती सुझुकी इंडिया कंपनीच्या संचालक मंडळाने 4,960 कोटी रुपयांच्या खर्चाला परवानगी दिली आहे. मारुती सुझुकी कंपनीचा गुजरातमधील खोराज येथील गुजरात औद्योगिक विकास महामंडळाच्या जमिनीवर प्रकल्प कार्यरत आहे. नवी गुंतवणूक केल्यानंतर या प्रकल्पाची उत्पादन क्षमता दहा लाख युनिटने वाढविली जाऊ शकेल. या संदर्भात या कंपनीने शेअर बाजारांना माहिती कळविली आहे. सध्या मंजूर करण्यात आलेल्या रकमेतून मुख्यतः जमिनीचे अधिग्रहण केले जाणार आहे. त्यानंतर या जमिनीवर प्रकल्प उभारण्यासाठी संचालक मंडळ आगामी बैठकीमध्ये आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे. यासाठी कंपनीच्या अंतर्गत शिलकीतून काही रक्कम घेतली जाणार आहे. तर काही रक्कम भांडवल बाजारातून उपलब्ध केली जाणार असल्याची कंपनीने स्पष्ट केले आहे. सध्या कंपनीचे गुजरात आणि हरियाणात चार प्रकल्प आहेत. या प्रकल्पाची उत्पादन क्षमता 24 लाख युनिट प्रति वर्ष इतकी आहे. या क्षमतेचा सध्या पूर्णपणे वापर केला जात आहे. अशा परिस्थितीत आगामी काळातील मागणी लक्षात घेऊन या प्रकल्पाचे विस्तारीकरण करण्याची गरज असल्याचे मत संचालक मंडळाने व्यक्त केले आहे. विस्तारीकरणाच्या प्रकल्पात एकूण 35 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असल्याचे कंपनीने गेल्या वर्षी जाहीर केले होते. यामुळे कंपनीची उत्पादन क्षमता दहा लाख युनिटने वाढणार आहे. कंपनीच्या वाहनांना देशात मागणी आहे. त्याचबरोबर परदेशातही मागणी आहे.