नवी दिल्ली – केंद्र सरकारने वर्षाच्या सुरुवातीला प्राप्तिकर उत्पन्नात केलेले वाढ आणि जीएसटी दरात झालेली कपात या कारणामुळे 2025 मध्ये वाहनांची विक्री वाढण्यास मदत झाली आहे. अशा परिस्थितीत भारतात सर्वात जास्त प्रमाणात प्रवासी वाहनांची निर्मिती करणार्या मारुती सुझुकी कंपनीचे उत्पादन 2025 मध्ये वाढून 22.55 लाख युनिट या उच्चांकी पातळीवर गेले आहे. सलग दुसर्या वर्षी कंपनीचे वाहन उत्पादन 20 लाखापेक्षा जास्त झाले आहे. या उत्पादनामध्ये देशांतर्गत विक्रीसाठी निर्माण करण्यात आलेल्या वाहनाबरोबरच निर्यातीच्या वाहनांचा समावेश आहे. 2024 मध्ये कंपनीने 20.63 लाख युनिट वाहनांची निर्मिती केली होती. बाजारपेठेतून मागणी वाढली आहे. त्याचबरोबर कर्मचारी आणि व्यवस्थापनाचे संबंध सलोख्याचे आहेत. कंपनीचे वितरकाबरोबरही संबंध चांगले आहेत. अशा परिस्थितीतही निर्मिती वाढण्यास मदत झाली असल्याचे मत मारुती सुझुकी इंडिया कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक हिशानी तेकूची यांनी व्यक्त केले. मारुतीच्या वाहनाचे जास्तीत जास्त सुटे भाग भारतातच तयार केले जातात. त्याचबरोबर मारुती सुझुकी कंपनी आपल्या वाहनांच्या जागतिक दर्जाबाबत कसलीही तडजोड करत नाही. याचा अर्थ भारतातील उत्पादन आणि उत्पादन क्षमता आता जागतिक दर्जाची झाली असल्याचे त्यांनी सांगितले. मारुती सुझुकी बरोबरच भारतात उत्पादन घेणार्या इतर कंपन्यांच्या निर्यातीतही वाढ होत असल्याच्या बाबीकडे त्यांनी लक्ष वेधले.