नवी दिल्ली – ग्रामीण भागातील मागणी वाढल्यामुळे मारुती सुझुकी कंपनीला छोट्या कार विकण्यास मदत होत आहे. त्यामुळेच ऑक्टोबर महिन्यात मारुती सुझुकीच्या विक्रीत दहा टक्क्यांची वाढ होऊ शकली असे मारुती सुझुकी इंडिया कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक हिसाशी टाकेऊची यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
गेल्या काही महिन्यांत छोट्या कारपेक्षा एसयूव्हीची विक्री वाढत आहे. मात्र तरीही आम्ही छोट्या कारच्या निर्मिती आणि विक्रीवर लक्ष केंद्रित करणार आहोत. कारण भारतीय मध्यम वर्गाला आणि गरीब वर्गाला याची गरज आहे असे त्यांनी सांगितले.
मारुती सुझुकीने सेदान वर्गातील डिझायर कार नव्या स्वरूपात बाजारपेठेत सादर केली आहे. यामुळे आमची कार विक्री वाढण्यास मदत होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. कार निर्मिती क्षेत्रात स्पर्धा वाढली आहे. मात्र तरीही मारुती सुझुकी इंडिया कंपनीचा एकूण भारतीय बाजारपेठेतील वाटा 40% इतका आहे. तर छोट्या कारच्या क्षेत्रात मारुती सुझुकी कंपनीचा वाटा 50% इतका आहे.
यावेळी बोलताना कंपनीचे वरिष्ठ कार्यकारी अधिकारी पार्थो बॅनर्जी यांनी सांगितले की, गेल्या काही महिन्यापासून ग्रामीण भागातून छोट्या कारची मागणी वाढली आहे. यावर्षी पाऊस चांगला पडला आहे. त्याचबरोबर शेतकर्यांना पिकाला अधिक भाव देण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून मागणी वाढली असल्याचे समजले जाते.