सोलापूर – जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातून मनाला चटका लावणारी घटना समोर आली आहे. पोटच्या चिमुकल्याला विष पाजून आईने गळफास लावून आयुष्य संपवले. या प्रकरणात आईचा जागीच मृत्यू झाला आहे तर, चौदा महिन्यांच्या चिमुकल्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची मृत्यूसोबतची झुंज सुरू आहे. महिलेने टोकाचे पाऊल का उचलले? याचे कारण अद्याप अस्पष्ट असून, पोलिसांकडून तपास सुरू आहे. अंकिता उकिरडे असे आत्महत्या करणा-या महिलेचे नाव आहे. ही धक्कादायक घटना बार्शी शहरातील वाणी प्लॉट परिसरातून उघडकीस आली. महिलेने आधी चौदा महिन्यांच्या बाळाला विष पाजले. नंतर आईने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणात अंकिता उकिरडे यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणाची माहिती मिळताच स्थानिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच अंकिताचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. तसेच चिमुकल्याला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी नेले. बाळावर सध्या बार्शीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.