वऱ्हाडी भारावले…! सैनिकाचा विवाह अन् माजी सैनिकांचा सन्मान

विनोद मोहिते

इस्लामपूर – लष्करी सेवेत असणाऱ्या जवानाच्या विवाह सोहळ्यात माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला. आगळ्यावेगळया सन्मानाने उपस्थित वऱ्हाडी भारावले. पळशी (ता. खानापूर) येथील माजी सैनिक संभाजी आणि शिवाजी यांनी आपली पुतणी व रामदास पवार यांनी मुलगी ऋतिका हिचा विवाह सैन्यात असणाऱ्या आकाश जाधव या तरुणाशी करून दिला.

भारत मातेच्या सेवेत गेली ५० वर्षे सेवेत असणारे पवार व जाधव कुटुंब पळशी (ता. खानापूर.
जिल्हा.सांगली) येथे राहते. देश सेवेचे व्रत सांभाळणाऱ्या दोन्हीही कुटूंबानी विवाह सोहळा स्मरणीय केला. वधू ऋतिका ही पदवीधर आहे. तर आकाश हा जम्मू काश्मीर येथे भारतीय सैन्य दलात आहे.

त्याने सहा वर्षे सैन्य दलात सेवा बजावली आहे. पवार कुटुंबाने आपल्या घरातील पदवीधर मुलगी ऋतिका हिची लग्न गाठ सैन्यात असणाऱ्या आपल्या गावातीलच आकाश या तरुणाशी बांधली.
पवार कुटुंबातील वधू ऋतिका हिचे चुलत आजोबा, दोन चुलते माजी सैनिक आहेत. तर सध्या दोन चुलत भाऊ भारत मातेच्या रक्षणासाठी लष्करात सीमेवर कार्यरत आहेत. तर वर आकाश जाधव याचे वडीलांसह तीन चुलत आजोबांनी लष्करात सेवा बजावली आहे.

दोन्हीही कुटूंबाने आपल्या कौटुंबिक कार्यक्रमात सैन्य दलातील माजी सैनिकांना सन्मानित केले. अनेकदा लग्न समारंभात मान-पान, आहेर केला जातो. यावरून रुसवा-फुगवा असतो. पण बुधवारी पार पडलेल्या विवाह सोहळ्यात अक्षता पडण्यापूर्वी झालेल्या सन्मानाने माजी सैनिकांसह उपस्थित भारावून गेले.

विलास जाधव, विनायक पोळ, बबन मंडले, बबन शेळके, आनंदराव पाटील, संभाजी चौगुले यांच्यासह माजी सैनिकांचा सत्कार झाला. खानापूर-आटपाडी मतदार संघांचे माजी आमदार सदाशिव पाटील, विद्यमान आमदार अनिल बाबर यांनी वधूवरांना लग्नाला हजेरी लावली. अन् वधूवरांना आशीर्वाद दिले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.