प्रभात वृत्तसेवा पुणे – आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमिवर रविवारची सुट्टी कारणी लावावी म्हणून पुणेकर खरेदीसाठी मोठ्या संख्येने बाहेर पडले होते. शहर आणि उपनगरांतील नागरिकांमुळे शहरातील मध्यवर्ती पेठांतील भाग गर्दीने फुलून गेला होता. गर्दीमुळे मध्यवर्ती भागातील वाहतुकीचा वेग कमालीचा मंदावला होता. संथ गतीने जाणाऱ्या वाहनांमुळे वाहने पार्क करून खरेदीला आलेल्या नागरिकांना आणि वाहनचालकांना मनस्तापाला सामोरे जावे लागले.शनिवार-रविवारची सुट्टी असली की नागरिक फिरण्यासाठी किंवा खरेदीसाठी बाहेर पडतातच. त्यात आता श्रावण महिना सुरू झाला आहे. या महिन्यात अनेक सण येतात. रक्षाबंधन, स्वातंत्र्यदिन, गोकुळाष्टमी आणि पाठोपाठ येणारा पुणेकरांचा लाडका गणोशोत्सव. या सणांच्या काळात पुण्याची बाजारपेठ गर्दीने नेहमीच फुलते. रक्षाबंधन आठवड्यावर आला असून दहीहांडी दोन आठवड्यांवर आहे. त्याआधी स्वातंत्र्य दिन येत आहे. गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी तीनच सुट्टीचे शनिवार-रविवार मिळणार आहेत. त्यावेळी गर्दीला सामोरे जावे लागू नये यासाठी अनेक चाणाक्ष पुणेकर आज बाहेर पडले होते, त्यामुळे मंडई, लक्ष्मी रोड, रविवार पेठ, फडके हौद आणि अन्य पेठामध्ये वेगवेगळ्या खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. मंडई परिसरात तर एवढी गर्दी झाली होती की तेथून चालणेही अशक्य बनले होते. येत्या शनिवारच्या रक्षाबंधनामुळे अनेक तरूणी राखी खरेदीसाठी बाहेर पडल्या होत्या. तरुणही बहिणीसाठी भेटवस्तू खरेदी करण्याकरता शहरात आले होते. त्यामुळे तुळशीबाग, मंडई, आणि बाजीराव रस्त्यावर मोठी गर्दी झाली होती.त्यातच अनेक मंडळांनी गणेशोत्सवाची तयारी सुरू केल्याने अनेक ठिकाणी रस्ते, पादचारी मार्ग बंद किंवा अरूंद झाले आहेत. नागरिकांनीही गणेशमूर्ती निश्चित करण्यासाठी कुंभारवाडा आणि आसपासच्या भागात गर्दी केली होती. किरकोळ विक्रेतेही दुकानाची खरेदी करण्यासाठी मध्यवर्ती भागात आले होते. खरेदीसाठी बाहेर पडेलेले नागरिक आणि त्यांच्या वाहनांमुळे बाजीराव, लक्ष्मी, शिवाजी, केळकर रस्ता आदी रस्त्यांवर वाहतूक कोंडी झालेली होती.