Stock Market Today: सेन्सेक्सकडून 49 हजार अंकांचा टप्पा पार

मुंबई – शेअर बाजार निर्देशांक उच्च पातळीवर असूनही देशातील आणि परदेशातील गुंतवणूकदारांकडून जोरदार खरेदी चालू असल्यामुळे निर्देशांक घोडदौड करीत आहेत. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने आज प्रथमच 49 हजाराचा टप्पा पार केला.
गेल्या आठवड्यात इन्फोसिस कंपनीने चमकदार ताळेबंद जाहीर केला आहे. आज डी मार्ट कंपनीने नफादायक ताळेबंद जाहीर केल्यानंतर सकाळपासून गुंतवणूकदारांनी जोरदार खरेदी चालू ठेवली.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स एक टक्क्याने म्हणजे 486 अंकांनी वाढून 49,269 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 137 अंकांनी उसळुन 14,484 अंकावर बंद झाला.
एचडीएफसी बॅंक, एससीएल टेक, इन्फोसीस, एचडीएफसी, बजाज ऑटो, मारुती, टेक महिंद्रा आणि महिंद्रा कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली. मात्र बजाज फिन्सर्व, बजाज फायनान्स, रिलायन्स इंडस्ट्रीज, कोटक बॅंक, स्टेट बॅंकेला विक्रीचा मारा सहन करावा लागला.
विक्रमी पातळीवरही गुंतवणूकदार खरेदी करीत असल्याबाबत रिलायन्स सिक्युरिटी विश्लेषक विनोद मोदी यांनी सांगितले की, कंपन्यांचे चांगले ताळेबंद जाहीर होत असल्यामुळे गुंतवणूकदार खरेदी करीत आहेत.
16 जानेवारीपासून भारतात लसीकरण सुरू होणार आहे. त्याचबरोबर इतर कंपन्याही चांगले ताळेबंद जाहीर करतील, असे गुंतवणूकदारांना वाटते. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार भारताबाबत आशावादी असल्याचे वातावरण बाजारात निर्माण झाले आहे. या गुंतवणूकदारांनी शुक्रवारी 6,029 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली. परदेशी बाजारातून सकारात्मक संदेश आल्यामुळे सकाळपासून खरेदी चालू राहिली.




