satara | प्रक्रिया उद्योगातून शेतमालास बाजारपेठेची संधी

सातारा, (प्रतिनिधी) – प्रक्रिया उद्योगातून शेतकऱ्यांच्या गुणवत्तापूर्ण शेतमालास उच्चतम बाजारपेठ मिळण्याची संधी निर्माण होत आहे, अशीप्र माहिती राज्याचे कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिली. खरीप हंगामात शेतकऱ्यांना खते, बियाणांची कमतरता भासू नये यासाठी सर्वांनी खबरदारी घेऊन खरीप हंगाम यशस्वी करावा, असे आवाहन डॉ. गेडाम यांनी केले.
खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर डॉ. गेडाम यांनी जिल्ह्यात विविध ठिकाणी भेटी देऊन सूचना दिल्या. वाई एमआयडीसीतील ऑर्चर्ड ब्रँड प्रा. लि. या कृषी प्रक्रिया उद्योगाची त्यांनी पाहणी केली. प्रक्रिया उद्योगामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालास चांगली बाजारपेठ मिळत असल्याने त्यातून मिळणाऱ्या नफ्याचे व रोजगाराचे प्रमाण मोठे आहे. त्याचा फायदा शेतकऱ्यांना निश्चितच होणार असल्याचे डॉ. गेडाम यांनी सांगितले.
कृषी प्रक्रिया उद्योग कंपनीचे व्यवस्थापक ऋषिकेश शिंदे म्हणाले, फळांचे व भाजीपाल्याचे मूळ गुणधर्म व जीवनसत्व कायम राखून सर्व फळ पीकांचे ड्राय फ्रोजन करण्यात येते. हलक्या व गुणवत्तापुर्ण उत्पादित प्रक्रिया पदार्थास आईस्क्रिम, शीतपेय, हवाई प्रवास चॉकलेट, रेल्वे कॅन्टिन व हॉटेल्समध्ये मागणी व निर्यातीस वाव असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
हळद पिकाच्या गुणवत्तापुर्ण नमुन्यांची व विविध वाणांची व जिल्हयातील विविध कृषी प्रक्रिया उद्योगाविषयी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी दिली. या भेटीदरम्यान वाईचे तालुका कृषी अधिकारी प्रशांत शेंडे यांनी तालुक्यामध्ये होत असलेल्या पिकांची, कृषी प्रक्रिया व हळद उद्योगाविषयी माहिती दिली.
जिल्ह्यातील सर्व भेटींचे नियोजन विभागीय सहसंचालक बसवराज बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी आत्माचे प्रकल्प संचालक विकास बंडगर, स्मार्ट प्रकल्पाचे जिल्हा नोडल अधिकारी फिरोज शेख, कृषी अधिकारी पुरुषोत्तम दळवी, सर्व कृषी अधिकारी, मंडल कृषी अधिकारी वाई व मेणवली, तसेच वाईचे कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक उपस्थित होते.





