Pimpri : राख्यांनी सजली बाजारपेठ

कामशेत : रक्षाबंधन म्हणजे बहीण-भावाच्या नात्याचा अतूट धागा. प्रेम, आपुलकी आणि निष्ठेचे प्रतीक असलेल्या या सणाला अवघे काही दिवसच उरलेस आहेत. शहरासह परिसरातील बाजारपेठा सध्या विविध प्रकारच्या राख्यांनी सजल्या आहेत. बाजारपेठांमध्ये एक उत्सवी आणि रंगीबेरंगी वातावरण निर्माण झाले असून, राखी खरेदीसाठी महिलांनी मोठी गर्दी केली आहे.
चिमूकल्या भाऊरायांसाठी राख्यांमध्ये यंदा विशेष प्रकार पाहायला मिळत आहेत. पब्जी गेमवर आधारित राख्या, कार्टून कॅरेक्टर असलेली राखी, घड्याळासारखी राखी अशा राख्यांची मोठी मागणी आहे. दुकानदार लहान मुलांच्या आवडी-निवडी लक्षात घेऊन विविध प्रकारच्या राख्यांची दुकाने सजवून थाटली आहेत. रक्षाबंधन हा केवळ राखी बांधण्याचा सण नाही, तर नात्यांची जपणूक, विश्वास आणि प्रेमाचा अविष्कार आहे. आणि हे सर्व वातावरण सध्या कामशेत शहराच्या बाजारपेठेत उत्सवी रूपात दिसून येत आहे.
यंदा ‘पुष्पा राखी’ सर्वाधिक लोकप्रिय
यंदाच्या राख्यांच्या ट्रेंडमध्ये सर्वाधिक लक्ष वेधून घेत आहे ती म्हणजे दक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ चित्रपटावर आधारित राखी. ‘पुष्पा झुकेगा नहीं’ हा डायलॉग आणि त्याचा स्टाईल यामुळे ही राखी विशेषतः लहान भावंडांमध्ये आणि युवकांमध्ये लोकप्रिय ठरतेय. या राख्यांमध्ये अभिनेता अल्लू अर्जुनचे चित्र, त्याचे स्टाईलिश पोजेस, रंगीत लाईट्स आणि फॅन्सीसह विविध डिझाइन्स आहेत.
राख्यांच्या वैविध्यतेत वाढ
गोंड्यांच्या पारंपरिक राख्यांना महिलांमध्ये चांगलीच मागणी आहे. त्यामुळे बाजारात रंगीबेरंगी, विविध आकाराचे व प्रकाराचे गोंडेही मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी उपलब्ध आहेत. याशिवाय मोत्यांनी सजवलेल्या, हाताने विणलेल्या आणि कस्टमाईज राख्याही यंदा लोकप्रिय ठरत आहेत.
पोस्टासोबतच डिजिटलचीही जोड
गावी नसलेल्या भावासाठी काही बहिणी राख्या लवकरच खरेदी करून त्या पोस्टाने पाठवत आहेत. त्यामुळे रक्षाबंधनाच्या १५ ते २० दिवस आधीच बाजारात खरेदीला सुरुवात झाली असल्याचे काही दुकानदार सांगत आहेत. काही तरुण-तरुणी आणि दुकानदार सोशल मिडिया, व्हॉट्सअॅप, इंस्टाग्राम आदी डिजिटल प्लॅटफॉर्मवरून राख्यांची ऑनलाईन विक्री करत आहेत. विशेषतः दूर शहरात राहणाऱ्या भावंडांसाठी ऑनलाईन ऑर्डर करून थेट कुरिअरने राख्या पाठवल्या जात आहेत.
लुंबा राखीलाही विशेष मागणी
पारंपरिक राखीशिवाय आता भावाबरोबर वहिनीसाठी ‘लुंबा राखी’ बांधण्याची प्रथा लोकप्रिय झाली आहे. त्यामुळे महिलांच्या गाठीला बसणाऱ्या लुंबा राख्याही आकर्षक रंग, दागिन्यांच्या डिझाइनमध्ये सजून बाजारात विक्रीसाठी आल्या आहेत. या राख्यांमध्ये लहानशा कुंडलासारखी झुलणारी रचना असून त्यामध्ये सुद्धा नावीन्य आणि आधुनिकता दिसते.
विविध उपक्रमांचे आयोजन
काही शाळा, महिला मंडळे आणि स्वयंसेवी संस्थांद्वारे राखी मेळावे, राखी बनवा स्पर्धा आणि सेना जवानांना राखी पाठवा असे उपक्रम आयोजित करण्यात येत आहेत. यातून सामाजिक भान आणि देशप्रेमाची भावना वृद्धिंगत होत आहे.





