नवी दिल्ली – अमेरिकेने भारतावर 50 टक्के आयात शुल्क लावल्यानंतर देशांतर्गत बाजारपेठेला चालना देण्यासाठी 375 वस्तूंवरील जीएसटी कमी करण्याचा जीएसटी परिषदेचा निर्णय कमालीचा यशस्वी झाला आहे. 22 सप्टेंबर ते 21 ऑक्टोबर या कालावधीत भारतीयांनी 6 लाख कोटी रुपयांच्या वस्तूची खरेदी केली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. रिटेल विक्रीच्या आकडेवारीकडे लक्ष ठेवणार्या काही संस्थांनी ही माहिती संकलित केली असून गेल्या वर्षाच्या या महिन्याच्या तुलनेत यावर्षी झालेली विक्री 8.5 टक्क्यांनी वाढून 6 लाख कोटी रुपये म्हणजे 67.6 अब्ज डॉलरवर गेली आहे. या कालावधीत दागिने, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, कपडे, फर्निचर, मिठाई इत्यादीला जास्त मागणी होती. या महिन्यामध्ये वाहनांची विक्रीही विक्रमी झाली आहे. ज्या कंपन्यांच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली, त्यामध्ये मारुती सुझुकी इंडिया, टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल्स, महिंद्रा या कंपन्यांचा समावेश आहे. कारण कारवरील जीएसटी 28 टक्क्यांवरून 18 टक्के इतका करण्यात आला आहे. ह्युंदाई मोटर इंडिया कंपनीच्या विक्रीत 20 टक्क्याची वाढ झाली. टाटा मोटर्स कंपनीने एक लाखापेक्षा जास्त कार नवरात्री आणि धनतेरसदरम्यान विकल्या. महिंद्राच्या विक्रीत 27% वाढ झाली. ग्राहकांनी रोखीने खरेदी करण्याबरोबरच क्रेडिट कार्डच्या माध्यमातूनही दोन लाख कोटी रुपयांची खरेदी केल्याची आकडेवारी गेल्या आठवड्यात जाहीर झाली होती. हेल्मेटला सोडचिठ्ठी – मोटर सायकलधाराकांनी आता छोट्या कार खरेदी करण्यासाठी रीघ लावली आहे असे मारुती सुझुकी कंपनीचे म्हणने आहे. यामुळे मारुती सुझुकीच्या वितरकांना रविवारी काम करावे लागले. या वितरकादरम्यान एक विनोद सध्या चर्चेत आहे. तो म्हणजे दुचाकी सोडून छोटी कार घेणार्या बाईक चालकांची बरीच हेल्मेट सध्या मारुतीच्या वितरकांच्या दालनात राहत आहेत. छोट्या कारवरील कर कमी करण्याचा पाठपुरावा मारुती सुझुकीचे अध्यक्ष आर सी भार्गव यांनी प्रदीर्घ काळ केला होता. ही कंपनी आता एक नवीन प्रकल्प सुरू करण्याच्या विचारात आहे.