Pimpri : मध्यस्थीतून जुळले संसाराचे धागे; दोन मुलांसाठी पती-पत्नीचा सामोपचार
Pimpri : वर्षानुवर्षांचा कौटुंबिक वाद मिटला

पिंपरी – पती-पत्नीमधील कौटुंबिक मतभेद, गैरसमज आणि वाढत्या वादामुळे न्यायालयापर्यंत पोहोचलेला वैवाहिक वाद अखेर मध्यस्थीच्या माध्यमातून सामोपचाराने मिटविण्यात यश आले. दोन मुलांच्या भवितव्याचा विचार करून पती-पत्नीने परस्परांशी संवाद साधत पुन्हा एकत्र संसार करण्याचा निर्णय घेतला. या प्रकरणात मध्यस्थ अॅड. अतिश लांडगे यांच्यासह अॅड. किरण जाधव व अॅड. सावित्री दमकोंडवार यांची भूमिकाही महत्त्वाची ठरली.
सदर प्रकरण हिंदू विवाह कायदा, १९५५ मधील कलम १३(१)(ia) अंतर्गत पिंपरी येथील पी. एस. कुलकर्णी न्यायालयात दाखल करण्यात आले होते. दिनकर आणि ऐश्वर्या (काल्पनिक नावे) यांचा विवाह ३० डिसेंबर २०१८ रोजी झाला होता. या दाम्पत्याला एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन अपत्ये आहेत.
विवाहानंतर काही काळ संसार सुरळीत सुरू होता. मात्र, कालांतराने कौटुंबिक हस्तक्षेप, आर्थिक बाबी, घरगुती प्रश्न, मुलांचे संगोपन तसेच परस्पर वागणुकीवरून मतभेद वाढले. त्यातून दोघांमधील वाद न्यायालयापर्यंत पोहोचला. अर्जदाराने विवाह विच्छेदाची मागणी केली होती.प्रकरण मध्यस्थीसाठी अॅड. अतिश लांडगे यांच्याकडे पाठविण्यात आल्यानंतर दोन्ही पक्षांना आपापली बाजू मांडण्याची संधी देण्यात आली.
आरोप-प्रत्यारोपांपेक्षा वादामागील मूळ कारणे समजून घेऊन व्यवहार्य तोडगा काढण्यावर भर देण्यात आला. विशेषतः दोन लहान मुलांच्या मानसिक स्वास्थ्याचा आणि भविष्यातील संगोपनाचा विचार करण्यात आला.
मध्यस्थीच्या चर्चेतून अनेक गैरसमज दूर झाले. भविष्यात एकमेकांना मानसिक किंवा शारीरिक त्रास होईल असे वर्तन न करण्याचे तसेच कौटुंबिक शांतता राखण्याचे दोन्ही पक्षांनी मान्य केले. घरखर्चासाठी पतीकडून पत्नीला दरमहा दहा हजार रुपये देणे, मुलांचा एलआयसी व मेडिक्लेमचा खर्च करण्यासह आनंदाने एकत्र संसार करण्याचे दोघांनी मान्य केले. त्यानंतर दोन्ही पक्षांनी परस्पर संमतीने ठरलेल्या अटी स्वीकारून तडजोड-पुरशिस दाखल केली आणि प्रकरण सामोपचाराने निकाली काढले.
“वाद जिंकण्यापेक्षा नाते आणि मुलांचे भविष्य जपणे महत्त्वाचे आहे. न्यायालयात वाद सुरू झाला; मध्यस्थीत संवाद झाला आणि संवादातून तोडगा निघाला,” – अॅड. अतिश लांडगे, मध्यस्थ, पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण
PMRDA: पूर्व हवेलीतील कचऱ्यासाठी पीएमआरडीएचा प्लॅन





