भिंड – ऑनलाइन शॉपिंग वेबसाइटवरून कढीपत्त्याच्या नावाखाली गांजाची तस्करी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट खाद्यपदार्थांचे वितरण देखील करते. मात्र खाद्यपदार्थांच्या नावाखाली अवैध अंमली पदार्थांची तस्करी होत असल्याने कंपनीवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. याच प्रकरणात मध्य प्रदेशातील भिंडमध्ये शनिवारी पोलिसांनी ऑनलाइन गांजा विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपींकडून 20 किलो अमली पदार्थ जप्त केला आहे. तर आतापर्यंत या टोळीने तब्बल एक टन गांजाची तस्करी केल्याचे उघड झाले आहे.
भिंडचे पोलीस अधीक्षक मनोज कुमार सिंह यांनी सांगितले की, याप्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर कल्लू पवैया (वय 30) आणि ढाबा मालक ब्रिजेंद्र तोमर (वय 35) यांना शनिवारी भिंडमधील ग्वाल्हेर रोड येथून अटक करण्यात आली. आरोपींकडून 20 किलो गांजा जप्त करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 20 किलो गांजाची ही खेप विशाखापट्टणम येथून ई-कॉमर्स साइटवरून मागवण्यात आली होती.
– कढीपत्त्याच्या नावाखाली सुरु होता काळाबाजार
पोलिसांनी सांगितले की, ‘कल्लूने विशाखापट्टणममधील एका नामांकित ऑनलाइन ई-कॉमर्स कंपनीमध्ये बनावट पॅन क्रमांक आणि जीएसटी क्रमांकासह कढीपत्ता विकण्यासाठी आपली फर्म नोंदणी केली होती. याद्वारे ग्वाल्हेर, भोपाळ, कोटा, आग्रा आणि देशाच्या इतर भागांत कढीपत्त्याच्या नावाने गांजा आयात केला जात होता. या व्यवसायात ब्रिजेंद्र हा कल्लूला मदत करायचा.
– तस्करांनी करोडोंचा केला व्यवसाय
ही तस्करी पहिल्यांदा घडलेली नसून याआधीही कल्लूने 1 टन गांजा विकून 1 कोटी 10 लाखांचा व्यवसाय केला आहे. कल्लूने आपली कंपनी बनावट पॅन नंबर आणि जीएसटी नंबर इत्यादींनी चालवली आणि ई-कॉमर्स कंपनीला या व्यवसायात 66.66% नफाही मिळाला. ही तस्कर टोळी एका मोठ्या ई-कॉमर्स कंपनीच्या माध्यमातून आपले काम करत होती. यातून या कंपनीला दोन तृतीयांश नफाही मिळत होता.
पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, ई-कॉमर्स कंपनीवर अशा ड्रग्स व्यापारासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल कारवाई केली जाऊ शकते का, याचा तपास केला जात आहे.