नगर (प्रतिनिधी) – नगरची स्थानिक गुन्हेशाखा व पाथर्डी पोलिसांनी एकनाथवाडी (ता. पाथर्डी) येथील तीन शेतकऱ्यांच्या तुरीच्या शेतातील गांजाची झाडे ताब्यात घेतली. यातील दोन शेतकऱ्यांना ताब्यात घेण्यात आले असून, एक जणाचा पोलीस शोध घेत आहेत. यावेळी पोलिसांनी 62 किलो 345 ग्रॅम वजनाची गांजाची झाडे जप्त केली असून, त्याची किंमत अंदाजे 6 लाख 23 हजार 450 रुपये आहे. ही कारवाई आज सकाळी करण्यात आली.
विष्णू अनिल डोंगरे (रा. डोंगरवस्ती, एकनाथवाडी, ता. पाथर्डी), बाळासाहेब भानुदास खेडकर, शहादेव रावसाहेब खेडकर यांच्या शेतात ही गांजाची झाडे आढळून आली. शेवगाव-पाथर्डीचे उपअधीक्षक सुदर्शन मुंडे, नगर येथील स्थानिक गुन्हे शाखेचे अनिल कटके, पाथर्डीचे पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांच्यासह सुमारे तीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांनी एकनाथवाडी येथे बुधवारी सकाळी एकनाथवाडी येथे छापा घातला.
डोंगराच्या आतील बाजूस नगर व बीड जिल्ह्यांच्या सीमेलगत डोंगराळ भागात तीन शेतकऱ्यांनी गांजाची शेती केली होती. यावेळी तीन ते पाच फुटांपर्यंत वाढलेली सात पोती गांजाची झाडे पोलिसांनी जप्त केली. यावेळी दोन शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. तसेच एक शेतकऱ्याचा शोध पोलीस घेत आहेत.
पोलीस कर्मचारी व अधिकारी साध्या वेशात असल्याने कोणाला काहीच समजले नाही. सुमारे दोन ते तीन किलोमीटर पायी प्रवास करुन डोंगराच्या जवळच असलेल्या तुरीच्या शेतामधे तीन ठिकाणी गांजाची झाडे आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले.