नवी दिल्ली – उपराष्ट्रपती निवडणुकीतील विरोधी पक्षांच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांनीही वादग्रस्त वक्तव्याबद्दल महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीकास्त्र सोडले. त्याचवेळी निवडणुकीतील प्रतिस्पर्धी आणि सत्तारूढ एनडीएचे उमेदवार जगदीप धनखड यांनाही लक्ष्य करण्याची संधी अल्वांनी साधली.
कोश्यारी यांचे वक्तव्य दुर्दैवी आहे. पण, ते अनपेक्षित नाही. कोश्यारी यांना धनखड यांच्याकडून संदेश मिळाला आहेच. वाद, मूर्खपणाची वक्तव्ये आणि घटनाबाह्य केंद्र बनून कार्य करण्याची कृती बक्षीस मिळवून देते असा तो संदेश आहे, अशी उपहासात्मक टिप्पणी अल्वा यांनी ट्विटरवरून केली. उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर होण्याआधी धनखड यांच्याकडे पश्चिम बंगालच्या राज्यपालपदाची जबाबदारी होती.
ती जबाबदारी सांभाळत असताना धनखड आणि बंगाल सरकारमध्ये सातत्याने विविध मुद्द्यांवरून संघर्ष होताना दिसला. त्यातून धनखड हे भाजपच्या निर्देशावरून कार्य करत असल्याची टीका बंगालमधील सत्तारूढ तृणमूल कॉंग्रेसने नेहमीच केली. त्याचा संदर्भ अल्वा यांनी धनखड यांना सूचकपणे लक्ष्य करताना घेतला.