लाखणगाव, (वार्ताहर) – पोंदेवाडी (ता. आंबेगाव) येथील खारावस्ती येथे मेंढपाळ काशिनाथ बबन करे यांच्या घोडीवर बिबट्याने शनिवार, दि.२९ रोजी पहाटे हल्ला केल्याने घोडीचा मृत्यू झाला आहे. या ठिकाणी बिबट्याचे वारंवार दर्शन होत आहे. वनविभागाने येथे पिंजरा लावावा, अशी मागणी पोंदेवाडीचे माजी सरपंच बबनराव वाळुंज यांनी केली आहे. पोंदेवाडी गावच्या हद्दीतही खारावस्ती या ठिकाणी शेतकरी बबन वाळुंज यांच्या शेतात मेंढपाळ काशिनाथ बबन करे यांच्या मेंढ्याचा तळ बसला होता. या ठिकाणी या तळाच्या जवळच बोजा वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या त्यांच्या गोड्याही बांधलेल्या होत्या. रात्रीच्या वेळी बिबट्याने घोडीवर हल्ला केल्याने. घोडीचा मृत्यू झाला आहे. यामुळे मेंढपाळाचे अंदाजे ४० ते ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. वनरक्षक साईमाला गीते यांनी सदर ठिकाणी भेट देऊन पंचनामा केला आहे. वनविभागाच्या वतीने पाळीव प्राण्यांवर बिबट्याने हल्ला केला व हे पाळीव प्राणी मृत झाल्यास मदत केली जाते. परंतु वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळे येथील शेतकरी भयभीत असून या ठिकाणी पिंजरा लावावा, अशी मागणी बबनराव वाळुंज यांनी केली आहे. आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात मोठ्या प्रमाणावर बिबट्याचा वावर आहे. घोडनदी व डिंभे उजव्या कालव्यामुळे या परिसरात बारमाही शेती बागायती आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ऊसाचे पीक घेतले जाते. उसाचे क्षेत्रही मोठे आहे. त्यामुळे या परिसरात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणावर असून येथे वारंवार बिबटे दृष्टिस पडतात.येथे येऊन नागरिकांमध्ये वनविभागाने जनजागृती केली पाहिजे. – विशाल कारंडे, माजी उपसरपंच काठापूर.