नगर, (प्रतिनिधी) – शालेय पोषण योजना केंद्र व राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि खासगी अनुदानित पहिली ते ८ वी पर्यतच्या विद्यार्थ्यांना पोषण आहार दिला जात आहे. या योजनेत काम करणार्या कर्मचार्यांना अत्यल्प मानधन दिले जात आहे. या मानधनात वाढ करावी, या मागणीसाठी सम्यक फाऊंडेशन प्रणित श्रमिक मजदुर संघ शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी एक दिवस खिचडी बंद आंदोलन करण्यात आले. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महेंद्र विधाते, जिल्हाअध्यक्ष सविता विधाते, सुभाष सोनवणे, जिल्हा सरचिटणीस विद्या अभंग, जिल्हा कोषाध्यक्ष मेजबीन सय्यद, राज्य समन्वयक शितल दळवी, राज्य समन्वयक उत्तम गायकवाड, राज्य समन्वयक कैलास पवार आदीसह मोठ्या संख्येने शाळेय पोषण आहार कर्मचारी उपस्थित होते. शालेय पोषण आहार कर्मचारी यांना दरमहा फक्त २ हजार ५०० रुपये इतके तुटपुंजे मानधन मिळते आहे. शासनाने १ हजार रुपयांनी मानधन वाढविण्याचा शासन निर्णय काढण्यात आला आहे. मात्र ते ही अद्याप दिले जात नसल्याचे आंदोलकांनी म्हटले आहे. या उलट कामात प्रचंड वाढ केली आहे. शालेय परिसर, वर्ग आणि स्वच्छ्ता गृह साफसफाई करण्यासाठी दबाव आणला जात असून नव्याने सुरू करण्यात आलेला मेनू कसा शिजवून घ्यायचा, हा मोठा प्रश्न निर्माण झाला. असून कर्मचार्यांवर अधिकच्या कामाचा तान देवू नये असे आंदोलकांनी म्हटले आहे.