मराठमोळी अभिनेत्री छाया कदम निर्मित ‘बारदोवी’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज

मानवी नातेसबंध, तांत्रिक, रहस्य, अतर्क्य घटना असलेल्या बारदोवी हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या सिनेमाची निर्मिती मराठमोळी अभिनेत्री छाया कदम यांनी केली आहे. करण शिवाजीराव चव्हाण यांनी चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. सतोरी एन्टरटेन्मेंट प्रस्तुत “बारदोवी” या चित्रपटाची निर्मिती कृष्णार्पण मोशन पिक्चर्स, शुभारंभ मोशन पिक्चर्स यांनी केली आहे. तर अमित जाधव, अर्जुन जाधव, प्रणित माणिक शिवाजी वायकर, संदीप बाबूराव काळे, एल्विन राजा या चित्रपटाचे निर्माते आहेत, तर छाया कदम या सहनिर्मात्या आहेत.
चित्रपटात ‘या’ कलाकारांनी साकारली दमदार भूमिका
छाया कदम यांच्यासह चित्रपटात चित्तरंजन गिरी, विराट मडके यांच्यासारखे कसलेले कलावंत आहेत. तर विक्रम पाटील यांनी कॅमेरा, अरविंद मंगल यांनी प्रोडक्शन डिजाइन आणि विकास डीगे कार्यकारी निर्माता आहेत. कसदार कथानकाला दमदार तांत्रिक बाजू, पार्श्वसंगीताची साथ असल्याचं ट्रेलरवरून दिसून येतं. म्हणूनच हा चित्रपट हिंदीतील वेगळा अनुभव देणारा ठरणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर पाहून चित्रपटाविषयीची प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.
छाया कदम यांचे सिनेमे
छाया कदम या नुकत्याच लापता लेडिज या सिनेमातून मंजू माई भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या होत्या. त्याचप्रमाणे त्या मडगाव एक्सप्रेस या सिनेमातूनही प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. याशिवाय छाया यांनी मराठी-हिंदीमध्ये अनेक भूमिका साकारल्या आहेत. ‘सैराट’, ‘फँड्री’, ‘सरला एक कोटी’, ‘न्यूड’, ‘हंपी’ या चित्रपटात त्यांनी महत्वाची भूमिका साकारली आहे.





