सातारा : ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन समीप येऊन ठेपल्याने संपूर्ण महाराष्ट्राच्या साहित्यिक वर्तुळाच्या नजरा साताऱ्याकडे लागून राहिल्या आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पदाधिकारी संयोजन मंडळासह साताऱ्यातील साहित्य प्रेमींनी संमेलनात सक्रिय सहभाग नोंदवला असून या साहित्य संमेलनावर सातारकरांची छाप कशी राहील यावर कटाक्ष ठेवला आहे. अगदी प्रकाशन कट्ट्यापासून ते निमंत्रित साहित्यिकांपर्यंत सातारकर मंडळींचा दबदबा दिसून येत आहे. मराठी साहित्य संमेलन म्हणले की आरोप प्रत्यारोपाचे वितंड वाद आणि त्यातून होणारी शाब्दिक शेरेबाजी हा प्रकार यंदाच्या सातारा येथे होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाबाबत आजपर्यंत तरी दूर आहे. साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदाची जबाबदारी पितापुत्रांना मिळावी हा दुर्मिळ योगायोग या संमेलनाने साधला आहे. 1993 च्या ६६व्या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष कै. अभयसिंहराजे उर्फ भाऊसाहेब महाराज होते, तर त्यांचे सुपुत्र सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले 99 व्या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. महामंडळ आणि साहित्य संमेलनाचे संयोजक महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाहूपुरी शाखा आणि मावळा फाउंडेशन यांच्यामध्ये सातारकर मंडळीच मजबूत दुवा म्हणून काम करत आहेत. यामध्ये संयोजन समितीचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी हेच महामंडळाचे कोषाध्यक्ष आहेत. त्यांच्याच खांद्यावर साहित्य संमेलनाचे शिवधनुष्य पेलण्याची जबाबदारी आहे. त्यांच्यासमवेत अध्यक्ष मिलिंद जोशी तसेच कार्यवाह सुनीताराजे पवार सक्रिय आहेत. कोअर कमिटीमध्ये सुद्धा सातारकर मंडळींचा दबदबा दिसून येत आहे. मराठी मनाचा साहित्याचा सोहळा, साताऱ्यात रंगणार अक्षरांचा मेळा अशी घोषवाक्ये साताऱ्यात ठिकठिकाणी दिसू लागली असून मुहूर्त जवळ आल्याने साहित्य वर्तुळामध्ये गजबज सुरू झाली आहे. येथील राजपथावर जनता सहकारी बँकेच्या तळमजल्यावर प्रशस्त दालनांमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या वॉर रुममध्ये संयोजक, कार्यकर्ते आणि साहित्यिक मंडळींची वर्दळ सुरु झाली आहे. कंदी देऊन संधी साधणारे सातारकर अशा शब्दांमध्ये महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी यांनी या कौतुक मंडप उभारणीच्या शुभारंभ कार्यक्रमात केले होते. येथील शाहू स्टेडियममध्ये प्रशस्त दालने उभी करण्यात येत असून मुख्य दालनामध्ये गझल कट्टा, प्रकाशन कट्टा ,परिसंवाद तसेच साताऱ्याचे अंतरंग उलगडणारी काही प्रदर्शने पाहायला मिळणार आहेत. तेलंगणा, मुंबई, कोलकाता, कर्नाटक, मध्य प्रदेश तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील दीडशे निमंत्रितांना साताऱ्यात संमेलनाचे आमंत्रण देण्यात आले असून त्यांच्या निवासाची सोय वेगवेगळ्या पद्धतीने करण्यामध्ये संयोजक मशगूल आहेत. या यादीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे. मसाप शाहूपुरी शाखेचे समन्वयक नंदकुमार सावंत यांच्यासाठी दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस अशी अहोरात्र धावपळ सुरू आहे. माजी अध्यक्षांना विशेष निमंत्रण… मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना साहित्य संमेलनाचे निमंत्रण देण्यात आले असून त्यांच्या उपस्थितीचा परिणाम साहित्य कार्यक्रमांवरहोणार नाही यादृष्टीने नियोजन केले आहे. सुरक्षेसाठी व्हीआयपी प्रवेशकक्ष व इतरांसाठी साहित्य नगरीमध्ये येण्याचे प्रवेशद्वार स्वतंत्र ठेवण्यात आले आहे. जिल्हाधिकारी संतोष पाटील व पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी याचा आढावा घेतला. साहित्य संमेलनाच्या गेल्या दहा माजी अध्यक्षांना यावेळी विशेष निमंत्रित म्हणून बोलावण्यात आले असून त्यांचे संमेलनातील अनुभव आणि त्यांच्या प्रकट मुलाखती किंवा त्यांच्याशी संवाद साधण्याची दुर्मिळ संधी संमेलनात सहभागी होणाऱ्या साहित्य रसिकांना मिळणार आहे. यापूर्वी असा कोणीही प्रयोग केला नसल्याने यंदाचे साहित्य संमेलन खऱ्या अर्थाने आगळे वेगळे ठरणार असल्याची संयोजकांची खात्री आहे. साताऱ्यातील ज्येष्ठ साहित्यिकांचा सन्मान, प्रकाशन कट्टा, परिसंवाद, फोक आख्यान, संवाद लक्षवेधी, संवाद कादंबरीकारांशी अशा कार्यक्रमांची मांदियाळी साहित्य संमेलनात आहे.