प्रभात वृत्तसेवा सातारा – स्वराज्यविस्तारक छत्रपती शाहू महाराज साहित्यनगरी (सातारा) – मायमराठीची अवहेलना होत असताना मावशीचे कोडकौतुक सहन करू शकत नाही. महाराष्ट्रात मराठी भाषेचीच सक्ती असायला हवी. आमचा कोणत्याही भाषेला विरोध नाही; पण ती सक्तीने शिकविण्याला विरोध आहे. नव्या शैक्षणिक धोरणाशी विसंगत असलेला हिंदी भाषा सक्तीने शिकविण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने कायमचा रद्द करावा. हिंदी भाषा सक्तीला आमचा विरोध सांस्कृतिक कारणास्तव आहे, कारण हिंदीचे मराठीवरील सांस्कृतिक आक्रमण वाढत आहे. या सक्तीमुळे महाराष्ट्राची मराठीभाषक राज्य म्हणून असलेली ओळख भविष्यात पुसट झाल्यास राज्याची मोठी हानी होईल, असा इशारा अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिला. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन समारंभात प्रा. मिलिंद जोशी बोलत होते. ते म्हणाले, महाराष्ट्राची ओळख व अस्मिता म्हणजे मराठी भाषा व संस्कृती आहे. इतर कोणत्याही राज्यात पहिलीपासून तिसरी भाषा शिकविली जात नाही. मग महाराष्ट्रात ती आपण का लादत आहात? या सर्व तर्कशुद्ध मुद्द्यांचा विचार करून तिसरी भाषा सक्तीने शिकविण्याचा शासन कायमचा रद्द करावा अशीच भूमिका महाराष्ट्र शासनाच्या सल्लागार समितीची देखील आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचा आनंद या हिंदी व अन्य भारतीय भाषांच्या शासनाकडून केल्या गेलेल्या सक्तीमुळे हिरावून घेतला जात आहे. भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर मिळणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या निधीतून मराठीच्या बोलींचा अभ्यास, संशोधन आणि साहित्याचा संग्रह, प्राचीन ग्रंथांचा अनुवाद, महाराष्ट्रातील ग्रंथालयांचे सबलीकरण, मराठीच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या संस्था आणि व्यक्ती यांना भरीव मदत यासाठी निधी कमी पडणार नाही याची काळजी घ्यावी लागेल.संमेलनावर टीका करणाऱ्यांना चोख उत्तर देताना प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावर हे मूठभरांचे संमेलन आहे, अशी टीका होते; पण टीका करणाऱ्यांना त्यांच्या मनातील आदर्श पर्यायी संमेलन आजवर उभे करता आले नाही ही वस्तुस्थिती आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांना जी प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे, ती सातत्य आणि वैविध्यामुळेच. या संमेलनाला समृद्ध अशी परंपरा आहेच ती समर्थपणे पुढे नेण्याचे काम साहित्य महामंडळाने आजवर केले आहे. जुन्यातले नवे आणि नव्यातले अगदी नवे स्वीकारत परंपरा आणि आधुनिकतेचा मिलाफ साधत साहित्य महामंडळाने आजवर वाटचाल केली आहे. ती अधिक जोमाने करताना बदललेले समाजमानस, तंत्रज्ञानातील क्रांती, तरूणाईच्या आशा-आकांक्षा आणि महामंडळाचा व्यवहार यांची सांगड घालायला हवी. ती आपल्याला साताऱ्यात होणाऱ्या ९९ व्या साहित्य संमेलनात बघायला मिळेल.