खासदार सी. आर. पाटील यांच्याकडे सोपविली सूत्रे
गांधीनगर – गुजरात भाजप प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे प्रथमच मराठी माणसाकडे सोपविण्यात आली आहेत. योगायोग म्हणजे महाराष्ट्राच्या पाठोपाठ गुजरात भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदीही चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नवसारीचे भाजप खासदार चंद्रकांत रघुनाथ पाटील ऊर्फ सी. आर. पाटील यांच्या गळ्यात गुजरात भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची माळ घालण्यात आली आहे. खासदार पाटील हे मूळचे जळगाव जिल्ह्यातील आहेत. गेल्या तीस वर्षांपासून ते नवसारीमध्ये कार्यरत आहेत.
पाटील 2009 पासून भाजपच्या तिकिटावर सुरत-नवसारी लोकसभा मतदारसंघातून तीन वेळा निवडून आले आहेत. 2014 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांच्या वाराणसी मतदारसंघाच्या विकासाचा कार्यभार सी. आर. पाटील यांच्यावर सोपवण्यात आला होता. पाटील हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे निकटवर्तीय मानले जातात.
खासदार सी. आर. पाटील हे खानदेशातील जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील पिंप्री अकारुत येथील रहिवासी आहेत. त्यांचा जन्म पिंप्री अकारुत येथेच झाला. त्यांचे शिक्षण आयटीआयपर्यंत झाले आहे. सुरतमध्ये 1989 मध्ये पोलीस कॉन्स्टेबलपदी ते भरती झाले होते. त्यानंतर सुरतमध्ये सामाजिक कार्य करत असतानाच त्यांनी राजकारणात प्रवेश केला. जीआयडीसीच्या अध्यक्षपदापासून भाजपची संघटनेतील अनेक महत्त्वाची पदे त्यांनी सांभाळली आहेत.