Marathi classic language: मराठी भाषेला मिळाला ‘अभिजात भाषे’चा दर्जा, जाणून घ्या काय होणार फायदे

मुंबई : ‘माझा मराठीची बोलू कौतुके, परि अमृतातेहि पैजासी जिंके….’ असं मराठी भाषेचं वर्णन ज्ञानेश्वर माऊलींनी केलं आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी अनेक वर्षांपासूनचा लढा अखेर यशस्वी झाला आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी 2013 सालापासून प्रयत्न केले जात आहेत. यापूर्वी, त्यासाठी रंगनाथ पठारे समिती स्थापन करण्यात आली होती.
आता, केंद्रीय कॅबिनेटमध्ये मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आल्याने 13 कोटी मराठीजनांसाठी ही आनंदाची बातमी आहे. मात्र, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने नेमका काय बदल होणार, काय फायदा होणार हे जाणून घेऊया. मराठी भाषेचा विकास, ग्रंथ साहित्य आणि संशोधनासाठी याचा फायदा होणार असून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी भाषा गौरवली जाणार आहे.
एखादी भाषा ‘अभिजात’ कशी ठरते?
कोणत्याही भाषेला अभिजात दर्जा देण्याचे अधिकार हे केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाला आहेत. गृह मंत्रालयाने 2005 साली हे अधिकार सांस्कृतिक मंत्रालयाला दिले. त्याचे काय निकष आहेत?
-भाषेचा नोंदवलेला इतिहास हा अतीव प्राचीन स्वरूपाचा म्हणजे 1500-2000 वर्षं जुना हवा.
-प्राचीन साहित्य हवं, जे त्या भाषिकांना मौल्यवान वारसा वाटतं.
-दुसर्या भाषासमूहाकडून उसनी न घेतलेली अस्सल साहित्यिक परंपरा हवी.
-‘अभिजात’ भाषा ही आजच्या भाषेपेक्षा निराळी हवी.
भारतात आत्ताच्या घडीला 6 भाषांना अभिजात दर्जा दिलेला आहे. तामिळ (2004), संस्कृत (2005), कन्नड (2008), तेलुगु (2008), मल्याळम (2013) आणि ओडिया (2014)
अभिजात दर्जाने काय बदल होतात?
एखाद्या भाषेला अभिजात दर्जा दिल्यानंतर काय लाभ होतात? आणि आतापर्यंत ज्या भाषांना हा दर्जा दिलाय त्यांना यातले कोणते लाभ दिले गेले याबद्दल 2016 साली सांस्कृतिक मंत्रालयाने सांगितलं होतं की संस्कृत, तामिळ, कन्नड, तेलुगु या भाषांसाठी काही संस्था उभारल्या गेल्या आहेत. तसंच या भाषांमधल्या प्रकल्पांना पाठबळ देण्यासाठी आर्थिक तरतूदही केली गेली होती. यात प्रत्येक भाषेसाठी दरवर्षी काही कोटी रुपये दिले गेले होते.
महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाने आपल्या वेबसाईटवर अभिजात दर्जा मिळण्याचे भाषा संवर्धनासाठी काय फायदे सांगितले आहेत.
-मराठीच्या बोलींचा अभ्यास, संशोधन, साहित्यसंग्रह करणं
-भारतातील सर्व 450 विद्यापीठांमध्ये मराठी शिकवण्याची सोय करणं
-प्राचीन ग्रंथ अनुवादित करणं
-महाराष्ट्रातील सर्व 12,000 ग्रंथालयांना सशक्त करणं
-मराठीच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती, विद्यार्थी अशा साऱ्यांना भरीव मदत करणं
-अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यास स्कॉलर्ससाठी दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळतात.
-अभिजात भाषेचा दर्जा मिळल्यानंतर सेंटर ऑफ एक्सलंन्स फॉर स्टडिज स्थापन करण्यात येते.
-अभिजात भाषेला प्रत्येक विद्यापीठात एक अध्यासन केंद्र स्थापन केलं जातं.





