शिरूर: साहस, नाट्य, विनोद आणि सामाजिक संदेश यांचा समावेश असलेला, आई-मुलीच्या नाजूक नात्यावर आधारित नवा मराठी चित्रपट ‘म्हणजे वाघाचे पंजे’ ३० मे २०२५ रोजी राज्यातील ३०० चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली असून, यानिमित्ताने शिरूर येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. ओम्स आर्टचे प्रमुख डॉ. संतोष पोटे, डॉ. सुनीता पोटे आणि कौशिक मेहता यांच्या निर्मितीखाली हा चित्रपट साकारला आहे. चित्रपटात सौरभ गोखले, निखिल चव्हाण, तमन्ना बांदेकर, संजय नार्वेकर, दीपाली सय्यद, चिन्मय उदगीरकर यांच्यासह प्राजक्ता हणमघर, अनिल नागरकर, मेघराज राजेभोसले, घनश्याम दारोडे आणि सिद्धेश्वर झाडबुके यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हर्षवर्धन वावरे आणि त्रिनिती यांनी संगीतबद्ध केलेल्या चार गाण्यांपैकी दोन गाणी प्रदर्शित झाली असून, यात रॅप, रोमँटिक आणि क्लासिकल गाण्यांचा समावेश आहे. ओम्स आर्टने यापूर्वी ‘कोती’ या चित्रपटाला राज्य शासनाचा पुरस्कार मिळवला आहे, तर ‘पोस्को’ चित्रपटालाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. ‘म्हणजे वाघाचे पंजे’ चित्रपटाचा IMDb वर ‘टॉप कास्ट’मध्ये उल्लेख झाला असून, यातील कथानक, अभिनय आणि सादरीकरण प्रेक्षकांना आवडेल, असा विश्वास डॉ. संतोष पोटे यांनी व्यक्त केला. चित्रपटातील अभिनेत्री तमन्ना बांदेकर म्हणाल्या, “आई-मुलीच्या नात्याला बॉलिवूडचा टच देत हा चित्रपट साकारला आहे. मराठी चित्रपटसृष्टीत करिअर करण्याचे स्वप्न सत्यात उतरले असून, दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याचा आनंद आहे.” चित्रपटाच्या कथानकाची आणि कलाकारांची प्रशंसा होत असून, हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवेल, अशी अपेक्षा निर्मात्यांनी व्यक्त केली आहे.