मुंबई – ‘बाईपण भारी देवा’ आयुष्यात येणाऱ्या प्रत्येकीच्या विश्वाभोवती फिरणाऱ्या आई, आजी, सासू, काकी, मावशी, ताई, आत्या अशा साऱ्यांच्या भावना शेअर करणारा आहे. अर्थात चित्रपटाचं कथानक महिलांभोवती फिरणारं असलं तरी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या प्रत्येक पुरुषालाही हा चित्रपट बरंच काही सांगून जाणार आहे.
चित्रपटात सहा बहिणींची कथा दाखवण्यात आली आहे. काही कारणामुळे एकमेकींपासून विभक्त झालेल्या आणि स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यात वेगवेगळ्या समस्यांना सामोऱ्या जाणाऱ्या या सहा बहिणींची कथा म्हणजे सर्वसामान्य आयुष्यातील सुपर वुमनची कथा आहे.
आपल्या समाजात अशा अनेक स्त्रिया आहेत ज्या महत्त्वपूर्ण भूमिका त्यांच्या-त्यांच्या पातळीवर बजावत असतात पण आपलंच कळत-नकळत त्यांच्याकडे दुर्लक्ष होतं. ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटातील अभिनेत्री समाजातील अशाच स्त्रियांचे प्रतिनिधित्व करताना दिसणार आहेत.
सध्या सगळीकडे ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. केदार शिंदे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. 30 जून रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला सर्वत्र खूप चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या चित्रपटाचे सगळे शो हाउसफुल होत असून, या चित्रपटाने बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनच्या ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटालाही मागे टाकलं आहे.
‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाची कथा, संवाद, या चित्रपटाचं दिग्दर्शन, गाणी या सगळ्यालाच प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देताना दिसत आहेत. पहिल्या आठवड्याच्या शेवटी 6.45 कोटींचा गल्ला जमवत हा चित्रपट पहिल्या वीकएण्डला सर्वाधिक कमाई करणारा यावर्षीचा मराठी चित्रपट ठरला आहे.
तर याचबरोबर आता या चित्रपटाने ‘IMDB’ या साईटवर कार्तिक आर्यनच्या चित्रपटापेक्षा जास्त रेटिंग्स मिळाले आहेत. या साईटवर ‘बाईपण भारी देवा’ला 8.8 रेटिंग्स आहेत, तर दुसरीकडे कार्तिक आर्यांच्या चित्रपटाला 7.5 रेटिंग्स आहेत.
त्यामुळे हा मराठी चित्रपट हिंदी चित्रपटांवर चांगलाच भारी पडलेला दिसत आहे. दरम्यान, या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर आणि दीपा चौधरी महत्वपूर्ण भूमिकेत दिसत आहेत.