‘लोकं मला ‘ओव्हरसाईज’, ‘जाड’ म्हणतात; पण…’, महिलांसाठी अपूर्वा नेमळेकरची खास पोस्ट

Apurva Nemlekar | लोकप्रिय अभिनेत्रा अपूर्वा नेमळेकर सध्या ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत काम करत आहे. या मालिकेतील तिच्या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. याआधीही तिने अनेक मालिकांमध्ये काम करत स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. आता तिने महिला दिनाचे निमित्त साधत एक खास पोस्ट शेअर केली आहे.
लोकं मला अनेकदा ओव्हरसाईज्ड,’ ‘जाड,’ किंवा ‘कर्वी’ म्हणतात. खाली खेचतात, पण मी हार मानत नाही. मी स्वतःच्या निकषांवर परिपूर्ण होण्यासाठी प्रयत्न करत राहते, अशा शब्दात अपूर्वाने महिला दिनाच्या निमित्ताने स्वतःच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
अपूर्वाने इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले की, ‘महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! मी एक स्त्री आहे याचा मला अभिमान वाटतो—साडी नेसणे, चांदीची दागिने घालणे, केस नीटसंवारणे, मेकअप करणे आणि माझ्या स्त्रीत्त्वाचा आनंद घेणे, हे सगळं मला खूप आवडतं. दरवेळी मी साडी नेसते, तेव्हा मला लहानपणीचे दिवस आठवतात—माझी आई, जी सरकारी अधिकारी होती, ती किती आत्मविश्वासाने तयार होत असे. तिच्या साडीची एकदम परफेक्ट पिनअप स्टाईल, तिच्या स्टार्च केलेल्या सुरेख कॉटन साड्या—एकही सुरकुती नाही—हे सर्व तिच्या शिस्तबद्ध आणि ताकदवान व्यक्तिमत्त्वाचे प्रतिबिंब होते. आजही, मी साडी नेसताना त्या आठवणींशी जोडली जाते आणि तिच्या शिकवणी, मूल्ये आणि नैतिकता मी माझ्यासोबत घेऊन चालते.’
तिने पुढे लिहिले की, अभिनेत्री म्हणून माझ्या शरीरावर नेहमीच टीका केली जाते—माझ्या अभिनयावर नाही, तर माझ्या शरीराच्या आकारावर. मला अनेकदा ‘ओव्हरसाईझड,’ ‘जाड,’ किंवा ‘कर्वी’ असे म्हटले जाते—जणू सौंदर्य केवळ एका विशिष्ट शरीररचनेतच बसते. सौंदर्याची तुलना केली जाते, एखाद्या ठरवलेल्या चौकटीत मला बसवण्याचा प्रयत्न केला जातो. लोक मला खाली खेचतात, पण मी हार मानत नाही. मी परिपूर्ण होण्यासाठी प्रयत्न करत राहते—पण समाजाच्या कल्पनांप्रमाणे नाही, तर माझ्या स्वतःच्या निकषांवर.
View this post on Instagram
‘मी माझी ओळख स्वतः ठरवते. माझ्या शरीरावर, माझ्या कलागुणांवर आणि आत्मविश्वासावर मला पूर्ण विश्वास आहे, कोणाच्याही कल्पनेतील आदर्श शरीरयष्टीत बसण्याची मला गरज नाही. प्रत्येक स्त्रीला बॉडी शेमिंग सहन करावे लागते, पण तिची किंमत वजनाच्या काट्याने किंवा दुसऱ्यांच्या मतांनी ठरत नाही.’
‘एक स्त्री ही एकाच वेळी कोमल आणि ताकदवान असते—ती जगाचा भार आपल्या खांद्यावर उचलते, पण तरीही आत्मसन्मानाने पुढे चालत राहते. संकटांना एकटी सामोरी जाते, पण तिचा आत्मा कधीच कमकुवत होत नाही. समाज तिला परखतो, पण ती अजून जास्त चमकते, स्वतःची नवी वाट तयार करते.’, असेही तिने पुढे लिहिले.
या महिला दिनी, प्रत्येक स्त्रीचा उत्सव साजरा करूया, जी आपली भावना स्वीकारते, पण त्याचवेळी ताकदीने उभी राहते. आपण सर्व जणी एकमेकींना प्रेरणा देत, सोबत उभ्या राहत आणि स्वतःच्या वेगळ्या प्रकाशात झळाळत राहूया.’, असे लिहित अपूर्वाने सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्रीची ही पोस्ट व्हायरल होत असून, महिलांविषयी तिने व्यक्त केलेल्या भावनांना अनेकांनी कमेंट करत सहमती दर्शवली.
दरम्यान, अपूर्वीच्या कामाबद्दल सांगायचे तर सध्या ती ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारत आहे. याआधी ती रात्रीस खेळ चाले, मराठी बिग बॉसमध्येही झळकली होती.




