Manoj Jarange | Maratha Reservation : मराठा आरक्षण आंदोलनाचा वाद आता न्यायालयात पोहोचला असून वकील गुणरत्न सदावर्ते यांनी आझाद मैदानात सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मनोज जरांगे पाटील आणि वीरेंद्र पाटील यांनी आदेशाचं उल्लंघन केल्याचा दावा याचिकाकर्त्यांने कोर्टात केला आहे. यावेळी हायकोर्टाने काही महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले असून मुंबईतील मराठा आंदोलन हाताबाहेर गेलं असल्याचंही न्यायालयाने म्हटलं आहे. मुंबईत संपूर्ण उच्च न्यायालय परिसराला घेराव घालण्यात आला आहे. उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या गाड्या अडवण्यात आल्या आहेत, त्यांना उच्च न्यायालयात येण्यापासून अडवण्यात आल्याचं न्यायमूर्तींकडून स्वतः सांगण्यात आलं. तसेच, मुंबईत अजून आंदोलनकर्ते येत आहेत, त्यांना कसं अडवणार अशी विचारणाही मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केली आहे. न्यायालयाने आजच्या सुनावणी राज्य सरकारला चांगलंच सुनावलं. दरम्यान, सुनावणीदरम्यान हायकोर्टाच्या बाहेर मराठा आंदोलक अनेक ठिकाणी उभे असल्याचं पाहायला मिळालं. एमी फाऊंडेशनने दाखल केलेल्या याचिकेत मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम आदेश दिले होते. मात्र, त्या आदेशाच उल्लंघन झाल्याचं याचिकाकर्त्यांकडून कोर्टाला सांगण्यात आलं. मनोज जरांगे पाटील आणि वीरेंद्र पाटील यांनी आदेशाचं उल्लंघन केल्याचा दावा याचिकाकर्त्यांने कोर्टात केला आहे. तर, आंदोलकांनी मुंबई अडवून ठेवली असल्याचा दावा अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी कोर्टात केला आहे. आझाद मैदान पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी श्रीकांत अडाते हेही उच्च न्यायालयात उपस्थित होते. तसेच, यावेळी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी या आंदोलनाला शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी मदत केल्याचा आरोप केला आहे. तसेच सदावर्ते यांनी या आंदोलनाची तुलना दिल्लीतील शाहीन बाग आंदोलनासोबत केली आहे. सदावर्ते म्हणाले की, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे लोक यांना अन्नधान्य ट्रकच्या माध्यमातून पुरवत आहेत. अंतरावालीत सराटीत पोलिसांना मारहाण झाली, महिला पोलिसांनाही मारहाण झाली. काल सुप्रिया सुळेंची गाडी अडवली, पाण्याच्या बॉटल फेकल्या. महिला पत्रकारांची छेड काढली जात आहे असंही सदावर्ते म्हणाले. सदावर्ते यांनी मराठा आंदोलनाची तुलना शाहीन बागच्या आंदोलनासोबत केली आहे. आंदोलकांना शाहीन बागप्रमाणे कोण फंड पुरवत आहे याची चौकशी व्हायला हवी असं सदावर्ते म्हणाले. आता कोर्ट या याचिकेवर नेमका काय निर्णय देणार? आंदोलन थांबणार की सुरु राहणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. ही बातमी नक्की वाचा… Maratha Reservation : “सगळ्या नियमांच उल्लंघन केलं, मुंबईत कोणालाही येऊ देऊ नका..”; हायकोर्टाच्या सरकारला सूचना