Maratha Reservation : मराठा आंदोलनाला पिंपरखेडचा आधार! शिधा आणि आर्थिक मदत मुंबईकडे रवाना

मुंबई : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनाला आज चौथा दिवस उजाडला आहे. लाखो मराठा आंदोलक या आंदोलनात सहभागी झाले असून, ‘आरक्षण मिळेपर्यंत माघार नाही’ अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे. मुंबईकर आणि मराठा कार्यकर्ते आंदोलकांच्या जेवणाची व्यवस्था करत असले तरी, मागील दोन दिवसांत अनेक दुकाने आणि हॉटेले बंद झाल्याच्या बातम्यांमुळे अन्न-पाण्याची गैरसोय होत असल्याचे दिसून आले.
या पार्श्वभूमीवर, शिरूर तालुक्यातील पिंपरखेड गावातील ग्रामस्थांनी एकजुटीने आंदोलकांसाठी शिधा पाठवण्याचा निर्णय घेतला. गावकऱ्यांनी सुमारे ५,००० आंदोलकांसाठी ४,००० चपात्या, १०० किलो शेंगदाणे, हिरवी-लाल मिरचीची चटणी, लोणचे, १३० किलो भेळ, २५० पाण्याचे बॉक्स, फरसाण, बिस्किटे आणि ५०,००० रुपयांची आर्थिक मदत गोळा करून रविवारी (दि. ३१) मुंबईकडे रवाना केली. ग्रामीण भागातील युवक आणि नागरिकांनी आंदोलकांच्या अन्न-पाण्याची व्यवस्था करण्यासाठी पुढाकार घेतला असून, आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत आहे.
पिंपरखेड येथील तरुण आणि ज्येष्ठांनी एकत्र येऊन ‘एक मराठा, लाख मराठा’च्या घोषणांनी गाव दणाणून सोडले. यावेळी त्यांनी मराठा समाजाच्या हक्काच्या आरक्षणाची मागणी लावून धरत सरकारने तातडीने कारवाई करावी, अन्यथा मराठ्यांचा अंत पाहू नये, अशा भावना व्यक्त केल्या.





