Maratha Reservation: मनोज जरांगेंच्या उपोषणाचा नववा दिवस; राज्य सरकारचं शिष्टमंडळ आज घेणार भेट

मुंबई – मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा नववा दिवस आहे. बुधवारपासून जरांगे यांनी पाण्याचा त्यागही केला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत ते उपोषण सुरूच ठेवणार आहे.
काल झालेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध असून मनोज जरांगे पाटील यांना उपोषण मागे घेण्याची मागणी केली. परंतु जरांगेंनी आपले उपोषण सुरूच ठेवले आहे. त्यानंतर आज राज्य सरकारचं शिष्टमंडळ अंतरवाली सराटीत जाणार आहे.
मात्र मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी जाणारे शिष्टमंडळ अगोदर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी बैठक पार पडल्यानंतर शिष्टमंडळ जालन्याकडे रवाना होणार आहे. अतुल सावे, नारायण कुचे आणि संदीपान भुमरे, उदय सामंत हे जरांगेची भेट घेणार आहेत. सर्वपक्षीय नेत्यांच्या ठरावाची प्रत हे शिष्टमंडळ जरांगे पाटील यांना देणार आहेत.
राज्य सरकारचं शिष्टमंडळ जरांगे पाटील यांना कायदेशीर बाबी समजावून सांगणार आहेत. तसेच त्यांना उपोषण मागे घ्या, अशी विनंती केली जाणार आहे. दरम्यान, राज्य सरकारने मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावं, अशी मागणी जरांगेंनी लावून धरलेली आहे.
मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्यावर तोडगा काढण्यासाठी काल सह्याद्री अतिथीगृहावर घेण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीत ‘मराठा आरक्षण द्यायला हवं’ असा सुर सर्वच पक्षाच्या नेत्यांकडून लावण्यात आला. सकाळी 10.30 वाजता सुरू झालेली ही बैठक तब्बल 2 तास चालली. त्यामुळे सरकारने जालन्याच्या (Jalana) आंतरवाली सराटीत आमरण उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना तातडीने आपले उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले.
मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत आहे. याच्या कायदेशीर बाबी पूर्ण करूनच टिकणारे आरक्षण दिले जाऊ शकते व त्यासंदर्भात राज्यातील सर्वच पक्ष एकत्रितपणे काम करायला तयार आहेत. कायदेशीर कार्यवाही शक्य तितक्या लवकर करण्यात यावी. मात्र, त्याला आवश्यक तो वेळ देणे गरजेचे आहे, हे पण लक्षात घेणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले होते.





