Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी ‘चलो मुंबई’; जामखेडमधून हजारो मराठा बांधव आंदोलनात होणार सहभागी

जामखेड : मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, या लढ्यासाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांनी ‘चलो मुंबई’चा नारा देत 29 ऑगस्टपासून मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाचा निर्धार जाहीर केला आहे. याच पार्श्वभूमीवर अखंड मराठा समाज, जामखेडच्या वतीने रविवारी, 24 ऑगस्ट 2025 रोजी जामखेड शहरात दुसरी नियोजन बैठक यशस्वीपणे पार पडली. या बैठकीत जामखेड तालुक्यातील हजारो मराठा बांधवांनी मुंबईतील आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला.
यापूर्वी 21 ऑगस्ट रोजी जामखेडमध्ये पहिली बैठक झाली होती. त्यानंतर पुढील नियोजनासाठी आजच्या बैठकीत मराठा बांधवांनी महत्त्वपूर्ण सूचना मांडल्या. तालुक्यातील गावागावात समन्वय बैठका घेऊन जास्तीत जास्त मराठा बांधवांना आंदोलनात सहभागी करून घेण्याचे ठरले. यासाठी वाहनांचे नियोजन, जेवण आणि पाण्याची व्यवस्था यावर सविस्तर चर्चा झाली. मराठा सेवक गावोगावी बैठका घेऊन वाहनांचे नियोजन करणार आहेत.
मनोज जरांगे पाटील 27 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता अंतरवाली सराटी येथून मुंबईकडे रवाना होणार असून, दुपारी अहिल्यानगर येथे पोहोचणार आहेत. याच दिवशी जामखेडमधील जुन्या तहसील कार्यालयासमोर हजारो मराठा बांधव मुंबईला जाण्यासाठी एकत्र येणार आहेत. सायंकाळी जामखेडमधून वाहनांनी निघालेले मराठा बांधव अहिल्यानगर येथे जरांगे पाटील यांच्या ताफ्यात सामील होणार आहेत.
या बैठकीला जामखेड तालुक्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, मराठा बांधव, सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, डॉक्टर्स, शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मराठा आरक्षणासाठीचा हा लढा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने पाठिंबा दर्शवला.





