Maratha Reservation | Bala nandgaokar : मनोज जरांगे यांनी मागील चार दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषणाला सुरूवात केली आहे. त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने मराठा बांधव मुंबईत दाखल झाले आहेत. सुरुवातीला मराठा बांधवांना गैरसोयींचा सामना करावा लागला होता. मात्र आता राज्यभरातून मराठा आंदोलकांच्या मदतीसाठी अनेकजण धावत आहेत. अशातच मनसे नेते अमित ठाकरे यांनीही मनसेच्या कार्यकर्त्यांना मराठा आंदोलकांना अन्न-पाणी पुरवण्याच्या सूचना दिल्या आहेत. एकीकडे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली आहे. तर दुसरीकडे मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी मनसैनिकांना मराठा बांधवांना मदत करण्याचे आवाहन केले आहे. मुंबईत आलेल्या मराठ्यांना कशाची कमी पडू देऊ नका, त्यांना एकटा आहे हे वाटू देऊ नका. त्यासाठी मनसेकडून हवी ती मदत करा, असं आवाहन अमित ठाकरे यांनी मनसैनिकांना केले आहे. तर, दुसरीकडे मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी देखील आपली भूमिका मांडली आहे. तसेच, सरकारने लवकरात लवकर आंदोलनावर तोडगा काढावा, तर आंदोलकांसाठी आझाद मैदानाची जागा कमी पडत असल्याने आंदोलनासाठी मुंबईतील वानखेडे मैदान उपलब्ध करून द्यावे, असेही त्यांनी म्हटले. ‘राज ठाकरें यांचा स्वभाव माहित आहे, ते स्पष्ट बोलतात, त्यांच्या पोटात एक ओठात एक नसते, असे म्हणत राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात केलेल्या वक्तव्यवरुन मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अमित ठाकरे यांच असं की हे लोक आपले आहेत, त्यांचा लढा सुरू आहे, त्यांना मदत करा, त्यांना मदत कमी पडू नका असे अमित ठाकरे यांनी म्हटलं आहे. माझी सरकारलाही विनंती आहे, आंदोलकांसाठी आझाद मैदानावर असलेली जागा कमी आहे. मराठा बांधवांना इतर व्यवस्था करणे आवश्यक आहे, मुंबईतील वानखेडे स्टेडियम दिलं तर बर होईल, त्यांना एकाच ठिकाणी जागा मिळेल, असे बाळा नांदगावकर यांनी म्हटलं आहे. आंदोलकांना काही कमी पडू देऊ नका, अशी सूचना आम्ही कार्यकर्त्यांना केली आहे. मी जरांगे पाटील किंवा आलेल्या आंदोलकांना विनंती करतो, कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी नियोजन करणे गरजेचे आहे. गणपतीमध्ये कोणाला अडचण नको, हा विचार करावा. सरकार कमी पडतेय का हे बोलण उचित नाही. गणपतीमध्ये काही ताण असतो, पण सरकार कमी पडत आहे असे नाही. कारण तेही काम करत आहे, असे म्हणत नांदगावकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. अमित ठाकरे यांची पोस्ट : “माझ्या प्रिय महाराष्ट्र सैनिकांनो, सध्या आपल्या मुंबईत राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले हजारो मराठा बांधव आंदोलनासाठी जमले आहेत. मराठा आरक्षण हा विषय शासनाच्या हाती आहे, त्याचा निकाल काय लागेल हे काळ सांगेल. पण एवढं मात्र नक्की, आज जे इथे उभे आहेत ते आपले बांधव आहेत. हे शेतकरी आहेत, मजूर आहेत, लहानशा जमिनीवर पोट सांभाळणारे आहेत, शिक्षणासाठी धडपडणारे युवक आहेत. म्हणजेच मराठा समाजातील प्रत्येक स्तरातील, प्रत्येक जीवन जगणारी आपलीच माणसं आहेत. ते आपल्या घरापासून, गावापासून, शेतापासून दूर येऊन इथे आंदोलन करीत आहेत. त्यांना काही कमी पडू नये, त्यांच्या मुलांच्या, आई-वडिलांच्या डोळ्यात पोटाची चिंता दिसू नये, ही जबाबदारी आपली आहे,” असं अमित ठाकरे म्हणाले. “माझं प्रत्येक महाराष्ट्र सैनिकाला स्पष्ट आवाहन आहे, जेव्हा गरज पडेल तेव्हा त्यांना अन्न-पाणी पुरवा. औषधोपचारात कोणतीही अडचण येऊ देऊ नका. त्यांच्या राहण्याची, त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घ्या. एकही मराठा बांधव असा राहू नये की ज्याला वाटेल की तो मुंबईत एकटा आहे. लक्षात ठेवा, ते आपलेच आहेत. त्यांची लढाई जरी आरक्षणासाठी असली, तरी ते आपली जबाबदारी आहेत, आणि आपण महाराष्ट्र सैनिक म्हणून आपली जबाबदारी पूर्ण पार पाडणार आहोत. आपण सर्वजण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलो, तर त्यांचं मनोबल दुप्पट होईल. आपला प्रत्येक महाराष्ट्र सैनिक या भावनेनं उभा राहील, ही मला खात्री आहे,” असंही अमित ठाकरेंनी म्हटलं आहे. जरांगे यांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर : दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनोज जरांगेंच्या आंदोलनावरुन टीका करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाचा विषय सोडवला होता, मग ते परत का आले, असा सवाल केला होता. त्यावर मनोज जरांगेंनी प्रत्युत्तर देत, ‘राज ठाकरे म्हणजे मानाला भुकलेलं पोरगं. फडणवीस त्यांच्या घरी चहा पिऊन गेला तरी मग पक्ष बरबाद झाला तरी चालतं. हुरळून जातात. कुचक्या कानाचं म्हणतात,’ असा टोला लगावला होता.