आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक; बीडमध्ये विनायक मेटे यांच्या नेतृत्वात मोर्चा

बीड – मराठा आरक्षण प्रश्नावर राज्याच्या राजकारणात खूप मोठा गदारोळ निर्माण झाला आहे. सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाज बांधवांमधून मोठ्या प्रमाण रोष व्यक्त करण्यात येत आहे.
या अनुषंगाने मराठा आरक्षणावर फेरविचार होण्यासंदर्भात आणि राज्य सरकारवर दबाव वाढवण्यासाठी आज बीडमध्ये मराठा क्रांती संघर्ष मोर्चास सुरुवात झाली आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला असून मराठा नेते विनायक मेटे यांच्या नेतृत्वात मोर्चा निघाला आहे.
ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे पोलिस यंत्रणेकडून दबाव आणला जात असल्याचा आरोप विनायक मेटे यांच्याकडून करण्यात आला. प्रशासनाचा दबाव असला तरी मोर्चा सुरु राहणार असा पवित्रा विनायक मेटे यांनी घेतला आहे.
यावेळी मोठ्या संख्येने महिला व पुरुषांची तसेच युवकांची या मोर्च्यामध्ये उपस्थिती होती.
तसेच कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडणार नाही तसेच कायदा व सुव्यवस्थेचे संपूर्ण पालन होईल याची दक्षता आयोजकांनी घेतली, असा दावा केला जात आहे.





