Maoists Arrested : तेलंगणात 20 माओवाद्यांना अटक; करेगुट्टा ऑपरेशननंतर पोलिसांची मोठी कारवाई

हैदराबाद (तेलंगणा) : छत्तीसगडसह महाराष्टात काही महिन्यांपासून नक्षलवाद्यांविरोधात विशेष मोहिम राबविली जात आहे. पोलिसांनी सुरु केलेल्या धडक कारवाईपर्यंत आत्तापर्यंत शेकडो नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. अशातच आता तेलंगणामध्ये झालेल्या मोठ्या कारवाईत 20 माओवाद्यांना अटक करण्यात आली असून 8 जणांनी आत्मसमर्पण केले.
तेलंगणाच्या मुलुगु जिल्ह्यातील पोलिसांनी माओवाद्यांच्या कारवायांविरुद्ध मोठी कारवाई केली. जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या क्षेत्रातून, वाझेडू, वेंकटपुरम आणि कन्नाईगुडम येथून पोलिसांनी एकूण 20 माओवाद्यांना अटक केली आहे. या अटकेत 1 विभागीय समिती सदस्य (डीव्हीसी), 5 क्षेत्र समिती सदस्य (एसीएम) आणि १४ पक्ष सदस्यांचा समावेश आहे.
अटक करण्यात आलेल्या माओवाद्यांकडून 03 इन्सास रायफल, 04 एसएलआर रायफल, एक 303 रायफल, मोठ्या प्रमाणात स्फोटक साहित्य आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. जिल्ह्यातील माओवादी नेटवर्क कमकुवत करण्याच्या दिशेने हे पोलिस ऑपरेशन एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.





