नागपूर : झारखंडमधील माओवादी नेता दिलीप याला यवतमाळ पोलिसांनी अटक केली आहे. दिलीप गत अनेक वर्षांपासून ड्रायव्हर म्हणून लपून बसला होता. यवतमाळ पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. झारखंड पोलिसांनी येथे येऊन त्याची ओळख पटवली. दिलीप याची अटक नक्षलविरोधी मोहिमेचे एक मोठे यश मानले जात आहे. दिलीप हा झारखंड येथील कुख्यात हुहुर्रु दलमचा नक्षली कमांडर होता. तो 2013 पासून यवतमाळमध्ये वास्तव्यास असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. तत्पूर्वी त्याने काही वर्षे मुंबईत एका बोअरिंगच्या मशीनवर काम केले होते. त्यानंतर एका व्यक्तीच्या माध्यमातून तो यवतमाळ येथे आला होता. तो तिथे ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करत होता. झारखंड पोलिसांनी यवतमाळमध्ये येऊन त्याची ओळख पटवली. त्यानंतर स्थानिक पोलिसांनी बुधवारी त्याला अटक केली. या प्रकरणी यवतमाळ पोलिसांचा सातत्याने झारखंड पोलिसांशीही पत्रव्यवहार सुरू होता. उल्लेखनीय बाब म्हणजे दिलीप याच्यावर नक्षली चळवळीसाठी आर्थिक वसुली करण्याची जबाबदारी होती. त्याने भुसुरुंग स्फोटही घडवून आणल्याचा दावा आहे. पोलिसांसोबतच्या चकमकीत प्रतिहल्ला करणे, सीआरपीएफ जवानाची हत्या केल्याचाही आरोप त्याच्यावर आहे. पण दलमच्या आर्थिक व्यवहारात त्याने गैरव्यवहार केला. त्यामुळे त्याने जिवाच्या भीतीने झारखंड सोडून मुंबई गाठली. तेव्हापासून त्याचे महाराष्ट्रात वास्तव्य आहे.