Maoist Commander Devji : सीपीआय (माओवादी) चा मुख्य रणनीतीकार आणि नक्षलवाद्यांचा महत्वाचा म्होरक्या थिप्पिरी तिरुपती ऊर्फ देवजी (Maoist Commander Devji) याने तेलंगणा पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. देवजीसोबतच आणखी एक म्होरक्या मल्ला राजी रेड्डी आणि इतर अनेक नक्षलींनी शस्त्रे खाली ठेवली आहेत. मूळचा तेलंगणातील जगतीयाल जिल्ह्याचा रहिवासी असलेल्या ६२ वर्षीय देवजीवर (Maoist Commander Devji) १ कोटी रुपयांचे बक्षीस होते. मे २०२५ मध्ये सरचिटणीस नंबला केशव राव ऊर्फ बसवराजु याच्या मृत्यूनंतर देवजीने संघटनेची धुरा सांभाळली होती. त्यानेच नक्षलवाद्यांच्या ‘पीपल्स लिबरेशन गनिमी आर्मी’ची स्थापना केली होती, ज्यामुळे त्याला संघटनेचा कणा मानले जात असे. आता त्याच्या शरणागतीमुळे ही बंदी घातलेली संघटना पूर्णपणे नेतृत्वहीन झाली असून, नक्षलवादाचा गड कोसळल्याचे मानले जात आहे. गेल्या दोन वर्षांत तेलंगणा पोलिसांच्या प्रयत्नांमुळे ५८८ नक्षलवाद्यांनी हिंसेचा मार्ग सोडून सामान्य आयुष्य स्वीकारले आहे.