पिंपरी | मोबाइलमुळे अनेकजण मतदान न करता परत फिरले

पिंपरी, (प्रतिनिधी) – मतदान केंद्राच्या परिसरात मोबाइल फोन प्रतिबंधित केल्यामुळे अनेक मतदार मतदान न करता परत फिरल्याचे धक्कादायक चित्र पहावयास मिळाले. एकीकडे निवडणूक आयोगाने मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रबोधन केले आणि दुसरीकडे मतदान केंद्रापर्यंत पोहचलेल्या मतदाराला मतदान न करता परत फिरावे लागले. यात पोलिसांची अडवणुकीची भूमिका मतदानाची टक्केवारी कमी करण्यास कारणीभूत ठरली.
यापूर्वी झालेल्या मतदानांच्या टप्प्यांमध्ये अनेकांनी मतदानाचे चित्रीकरण करत त्याच्या ्िलप्स सोशल मीडियावर टाकल्या होत्या. राजकीय पक्षांच्या नेत्यांनी देखील आपल्या पुढील टप्प्याच्या मतदानासाठी या क्िलप्सचा पूरेपूर वापर करुन घेतला. मोठ्या प्रमाणात या क्िलप्स व्हायरल झाल्या होत्या.
त्यानंतर निवडणूक आयोगाने मतदान केंद्रात मोबाइल नेण्यास प्रतिबंध केला. परंतु प्रतिबंध करण्यापूर्वी मोबाइल ठेवण्याची व्यवस्था केली नाही. परिणामी मोबाइल ठेवायचा कुणाजवळ असा प्रश्न मतदारांसमोर उभा राहिला.
ओळखीच्या व्यक्तींच्या हाती दिले मोबाइल
यावेळी अनेकांनी मतदान केंद्राबाहेरील ओळखीच्या व्यक्तींना शेाधून आपले मोबाइल त्यांच्याकडे सांभाळण्यासाठी दिले. परंतु ज्यांच्या ओळखीचे कोणी नव्हते त्यांना मतदान न करता परत जावे लागले. काही ठिकाणी राजकीय पक्षांच्या कार्यकत्र्यांनी मोबाइल सांभाळण्याची तयारी दर्शविली परंतु अनेकांनी त्यांच्याकडे मोबाइल दिला नाही.
एका घरातील एकाहून अधिक सदस्य मतदानासाठी आले होते, त्यापैकी एकाला इतरांचे मोबाइल सांभाळत बाहेर थांबावे लागले. घरातील इतर सदस्य मतदान करुन बाहेर आल्यानंतर मोबाइल सांभाळणाऱ्या सदस्यास मतदानासाठी जावे लागले. यात बराच वेळ वाया गेला.
पोलिसांचे वर्तन
काही मतदान केंद्रांवर पोलिसांच्या वर्तनाने दु:खी आणि अपमानित होऊन काही जण मतदान न करता परत फिरले. मोबाइल स्वीच आॅफ करतो, तुमच्याजवळ ठेवा असे पर्याय नागरिकांनी दिले परंतु पोलिसांनी अडवणुकीची भूमिका घेतली. यामुळे अनेक जण मतदान न करता घरी परत आले.
तर व्यवस्था का केली नाही?
निवडणूक आयोगाने मोबाइल आत नेऊ द्यायचे नाही हा निर्णय सख्तीने राबविण्याचे चौथ्या टप्प्यात ठरविले. हा निर्णय सख्तीने राबवायचाच होता तर मग येणाऱ्या मतदारांचा मोबाइल ठेवण्याची व्यवस्था का केली नाही? असा प्रश्न यावेळी नागरिकांनी उपस्िथत केला.
जर तुम्ही सावली, मेडिकल किट अशा अनेक व्यवस्था करु शकता तर मग मोबाइल ठेवण्याची व्यवस्था का करु शकत नाही? आजच्या युगात मोबाइल शिवाय राहणे अवघड असल्याचे माहीत आहे. मतदान केंद्र, खोली क्रमांक सर्व माहिती अॅपच्या माध्यमातून मोबाइलवर आहे मग मोबाइल ठेवायची व्यवस्था का नाही?





