शिर्डी – देशात करोनाची दहशत कायम आहे. मात्र, नववर्षाच्या स्वागतासाठी साईंच्या शिर्डीत अलोट गर्दी होवून सर्वांचे आनंदात दर्शन झाले. राज्य सरकारने घालून दिलेल्या नियम व अटींची अंमलबजावणी करताना साई संस्थानच्या प्रशासनाला खूप मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. तथापि, भाविकांच्या मनात करोनाची भीती किंचितही दिसत नसल्याचे चित्र होते.
साई समाधी दर्शनासाठी एकच प्रवेशद्वार व बाहेर पडण्यासाठी एकाच मार्गाचे नियोजन केल्याने नको ती गर्दी आणि गोंधळ झाला नाही. बायोमेट्रिक पासेसची सक्ती असल्याने भाविकांना रांगेत व शिस्तबद्ध वातावरणात दर्शनाचा लाभ घेता आला. विशेष म्हणजे हजारो पोलिसांच्या कडक बंदोबस्तामुळे कोणतीही चोरीची, पाकिटमारीची घटना घडली नाही.
31 डिसेंबर ते 1 जानेवारी 2021 या दोन दिवसांत लाखो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. इतकी छान व्यवस्था पहिल्यांदा अनुभवली असल्याची प्रतिक्रिया भाविकांनी दिली. तसेच साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे व त्यांच्या टीमचे विशेष आभार मानले. देशातील सर्वांत मोठे मेगा किचन अर्थात साई प्रसादालय याठिकाणी मोफत जेवणाची उत्तम व्यवस्था ठेवल्याने हजारो भाविकांनी त्याचा लाभ घेतला.
अनेक तीर्थस्थानी करोनाच्या पार्श्वभूमीवर काटेकोर पालन करूनही व्यवस्था कोलमडली असली तरी शिर्डीत येणार्या भाविकांना करोनाची जराही भीती जाणवली नाही. तोंडावर मास्क आणि साई नामाच्या गजराने शिर्डी दुमदुमून गेली होती. अतिरिक्त पोलीसबळ व साई संस्थांनच्या सुरक्षाकर्मचार्यांच्या मेहनतीने दर्शन रांगेचे उत्तम नियोजन करण्यात आले होते.
लहान मुले, वयस्कर भाविकांना प्रवेशबंदी असल्याच्या सूचना वारंवार ध्वनिप्रक्षेपणाद्वारे देण्यात येत होत्या. शिर्डीत येणार्या हजारो वाहनांची तपासणी करूनच त्यांना प्रवेश देण्यात येत होता. तर नववर्षाच्या स्वागतासाठी प्रत्येक वाहनावर शिर्डी पोलीस स्टेशनच्या वतीने वेलकमचे स्टिकरचा उपक्रम चर्चेचा विषय बनला होता.