अंबानी प्रकरण । २० दिवसांमध्ये ठाकरे सरकारपुढे कसा उभा राहिला अडचणींचा डोंगर?

मुंबई – विधानसभा निवडणुकांनंतर राज्यात झालेल्या मोठ्या राजकीय उलथापालथीनंतर शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येऊन स्थापन केलेली महाविकास आघाडी सत्तेत आली. आधीच्या भाजप-शिवसेना सरकारमध्ये मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना सत्तेतून खाली खेचत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राज्याचे नवे मुख्यमंत्री झाले. मात्र, शिवसेनेच्या नेतृत्वाखाली सत्तेत असलेल्या या सरकारला आपल्या १६ महिन्यांच्या कारकिर्दीत सातत्याने आव्हानांचा सामना करावा लागलाय.
गतवर्षी आलेले करोना संकट, अभिनेता सुशांत सिंग राजपूतचा मृत्यू, कंगनासोबत झालेला वाद, मंत्री संजय राठोड प्रकरण यांमुळे ठाकरे सरकारमागे एका मागून एक अडचणी उभ्या राहिल्या. अशातच आता उद्योजक मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली कार सापडल्याच्या प्रकरणामुळे राज्य सरकार व मुंबई पोलिसांच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्मण झालंय.
आज आपण या प्रकरणामुळे गेल्या २० दिवसांमध्ये ठाकरे सरकार कसं काय अडचणीत सापडलं याबाबतची माहिती जाणून घेणार आहोत.
२५ फेब्रुवारी – उद्योजक मुकेश अंबानी यांच्या मुंबई येथील अँटिलीया या निवासस्थानाबाहेर एक वाहन सापडलं. यामध्ये जिलेटीन या स्फोटकाच्या २० कांड्या भरल्याचे आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकाने (ATS) हाती घेतला.
२६ फेब्रुवारी – क्राईम ब्रांचचे तत्कालीन प्रमुख एपीआय सचिन वाझे यांच्याकडे या प्रकरणाचा तपास देण्यात आला. यानंतर पोलिसांनी स्फोटकांनी भरलेले ते वाहन मनसुख हिरेन नावाच्या एका व्यक्तीचे असल्याचं सांगितलं. मात्र हिरेन यांनी काही दिवसांपूर्वीच ते वाहन चोरीला गेलं असल्याची तक्रार नोंदविली होती.
१ मार्च – जैश-उल-हिंद नावाच्या एका दहशवादी संघटनेने या कटाची जबाबदारी स्वीकारली असल्याचं एक पत्र बाहेर आलं. मात्र यानंतर याच दहशतवादी संघटनेकडून त्या पत्राशी आपला काहीही संबंध नसून आधीच पत्र खोटं असल्याचं सांगण्यात आलं. तसेच उद्योजक अंबानी यांच्याशी कोणतेही वैर नसल्याचं जैश-उल-हिंदने स्पष्ट केलं.
५ मार्च – राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (NIA) करण्यात यावा अशी मागणी राज्याच्या अर्थसंकलीय अधिवेशनामध्ये मांडली.
६ मार्च – मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा येथील खाडीत संशयास्पद अवस्थेत आढळून आला. हिरेन यांचा मृतदेह सापडल्याने या प्रकरणाचे गूढ आणखीनच वाढले.
७ मार्च – मनसुख हिरेन यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी कमला यांनी एक तक्रार दाखल केली. यामध्ये त्यांनी एपीआय सचिन वाझे व आपले पती मनसुख हिरेन एकमेकांना आधीपासूनच ओळखत होते, अंबानींच्या घराबाहेर सापडलेले वाहन घटनेच्या आधी ५ फेब्रुवारीपर्यंत वाझे यांच्याकडेच होते असं सांगितलं. तर वाझे यांनीच आपल्या पतीला यामध्ये अडकवून त्यांचा खून केल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.
८ मार्च – मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात महाराष्ट्र दहशतवादीविरोधी पथक अर्थात एटीएसने अज्ञातांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला.
८ मार्च – विरोधी पक्ष नेते फडणवीसांनी याप्रकरणी महाराष्ट्र सरकारला धारेवर धरत पोलीस अधिकारी वाझे यांच्या अटकेची व तपास एनआयएकडे सोपविण्याची मागणी केली.
८ मार्च – महाराष्ट्र एटीएस तपास करत असल्याच्या या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) आपल्या हाती घेतला.
१० मार्च – महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी एपीआय सचिन वाझे यांची बदली क्राईम ब्रांचच्या बाहेर केली जात असल्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशनात जाहीर केलं.
११ मार्च – मनसुख हिरेन प्रकरणाचा स्वतंत्र तपास करीत असलेल्या महाराष्ट्र एटीएसने एपीआय सचिन वाझे यांचा जबाब घेतला.
१२ मार्च – सचिन वाझे यांनी अटकपूर्व जामिनासाठी ठाण्यातील जिल्हा न्यायालयामध्ये अर्ज केला. मात्र वाझेंना येथेही दिलासा मिळाला नाही. न्यायालयाने अटकपूर्व जामिनाची विनंती फेटाळत सुनावणी १९ तारखेपर्यंत पुढे ढकलली.
१३ मार्च – एनआयएने वाझे यांची १२ तास कसून चौकशी केली यानंतर त्यांना रात्री ११ वाजून ५० मिनिटांनी अटक करण्यात आली.
१४ मार्च – वाझे यांना एनआयए कोर्टात हजर करण्यात आले. येथे त्यांची २५ मार्चपर्यंत एनआयए कस्टडीमध्ये रवानगी करण्यात आली.
१५ मार्च – वाझे यांना पोलीस दलातून निलंबित करण्यात आलं. याबरोबरच एनआयएने एका पांढऱ्या रंगाची इनोव्हा गाडी शोधून काढली. ही इनोव्हा गाडी मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचच्या मालकीची असल्याचा आरोप आहे. २५ फेब्रुवारीला ही पांढरी इनोव्हा गाडी अंबानींच्या घराबाहेर लावण्यात आलेल्या स्फोटकांनी भरलेल्या गाडीच्या मागे होती असं म्हंटलं जातंय.
१५ मार्च – या प्रकरणामुळे विरोधकांनी चांगलेच धारेवर धरल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्टवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. विरोधकांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
१५ मार्च – एनआयएने पोलीस अधिकारी वाझेंच्या क्राईम ब्रांच ऑफिसमध्ये धाड टाकली. येथून वाझेंचा लॅपटॉप, मोबाईल, आयपॅड ताब्यात घेण्यात आलं.
१६ मार्च – मनसुख हिरेन प्रकरणानंतर महाविकास आघाडीमध्ये फूट पडल्याच्या बातम्या आल्या. यानंतर मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री नितीन राऊत, बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड, अशोक चव्हाण आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतली. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पायावर यांनी महाविकास आघाडीत कोणतीही फूट नसल्याचे सांगत ‘या प्रकरणामध्ये कोणालाही सोडले जाणार नाही’ अशी ग्वाही दिली.
१७ मार्च – वाझे यांच्याकडे या प्रकरणाचा तपास सोपविण्यात आल्यानंतर त्यांनी २७ फेब्रुवारी रोजी ते वास्तव्यास असलेल्या गृहनिर्माण सोसायटीमधील सर्व सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतली, असा दावा करणारं एक पत्र समोर आलं. वाझे यांनी ठाण्यातील एका दुकानामधील नोंदवही ताब्यात घेतल्याचेही समोर आले. दोन्ही वाहनांना लावण्यात आलेल्या दोन्ही नंबर प्लेट याच दुकानात बनवल्या असल्याचा आरोप आहे.
१७ मार्च – एनआयएने वाझे वापरत असलेली एक काळ्या रंगाची मर्सिडीज गाडी ताब्यात घेतली. गाडीतून स्फोटकं प्रकरणात वापरण्यात आलेल्या वाहनाची खरी नंबर प्लेट, ५ लाख रोख रक्कम, नोटा मोजण्याची मशीन जप्त करण्यात आले. वाझेंच्या लॅपटॉप, मोबाईल, टॅबलेटमधील सर्व डेटा दिलीत केला असल्याची माहिती एनआयएने दिली.
१८ मार्च – मुंबई पोलीस कमिशनर परम बिर सिंग यांची उचलबांगडी करत त्यांच्या जागी हेमंत नगराळे यांची नियुक्ती करण्यात आली.





