मनोज जरांगेंच्या शांतता रॅलीचा आज नाशिकमध्ये समारोप; पोलिस यंत्रणा सतर्क

Manoj Jarange | मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे हे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, या मागणीवर ठाम आहेत. मात्र या मागणीला ओबीसी नेत्यांकडून विरोध होताना दिसून येत आहे. अनेकदा मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगे यांच्यात शाब्दिक वाद झाल्याचेही पाहायला मिळाले.
दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी राज्यभरात शांतता रॅली काढली आहे. जरांगे यांच्या शांतता रॅलीचा आज नाशिकमध्ये समारोप होणार आहे. त्या पार्श्वभमीवर पोलिसांकडून विशेष काळजी घेतली जात आहे. नाशिकच्या समारोपाच्या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. रॅली मार्गावर वाहतूक सकाळपासून बंद ठेवून पर्यायी मार्गांची व्यवस्था करण्यात आली आहे. सीबीएस चौकात मंडप उभारण्यात आले आहे.
भुजबळ यांच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षेत वाढ
ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. दोन अधिकारी आणि 20 हून अधिक अंमलदार भुजबळ फार्म येथे तैनात करण्यात आले आहे. भुजबळांच्या घराभोवती बॅरिकेटिंग लावण्यात आले आहे. रॅलीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी महापालिका हद्दीतील प्राथमिक व माध्यमिक शाळांना 13 ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. Manoj Jarange |
मनोज जरांगेंच्या शांतता रॅलीचा समारोप
आज तपोवन जुना आडगाव नाका – निमाणी मालेगाव स्टॅण्डमार्गे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करत मनोज जरांगे पाटील यांचे स्वागत होणार आहे. त्यानंतर रविवार कारंजा, मेहेर सिग्नल यामार्गे नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील शिवतीर्थ येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ शिवस्मारकास मनोज जरांगे अभिवादन करतील. त्यानंतर सीबीएस येथील चौकात सकल मराठा समाज बांधवांना ते संबोधित करतील व शांतता रॅलीचा समारोप होईल. यादरम्यान मनोज जरांगे आज सभेतून नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. Manoj Jarange |
हेही वाचा:
आठवड्याच्या दुसऱ्या दिवशीही शेअर बाजार कमजोर; सेन्सेक्सची घसरणीसह सुरूवात





