Manoj Jarange Patil | राज्यात आज दसऱ्यानिमित्त सहा मेळावे होणार आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचा बीडमधील नारायण गडावर दसरा मेळावा होणार आहे. तसेच, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात भगवान गडावर दसरा मेळावा घेतला जाणार आहे. तर मुंबईत शिंदे आणि ठाकरे गटाचे दोन दसरा मेळावा होणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने कोण काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे हे पहिल्यांदा दसरा मेळावा घेणार आहेत. बीडमधील नारायणगड येथे होणाऱ्या या मेळाव्यात जरांगे मराठा आंदोलनाची पुढील दिशा जाहीर करणार आहेत. या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. पहिल्यांच मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात मराठ्यांचा दसरा मेळावा होत असल्याने मोठे संख्येने लोकांनी सहभाग घेत तयारी पूर्ण केली आहे. पार्किंग, वैद्यकीय कक्ष, पाण्याची सोय अन्… नारायण गडाच्या एकूण 900 एकर क्षेत्रावर या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. पाण्याची विशेष व्यवस्था करण्यात आल्याचं संयोजकांनी सांगितले आहे. तसेच जवळपास 200 एकरवर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली. नारायण गडावर होणारी गर्दी लक्षात घेता भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. 10 वैद्यकीय कक्ष उभारण्यात आले आहेत. येथे येणाऱ्या बांधवांना तात्काळ वैद्यकीय सेवा मिळणार आहे. तर, 100 पेक्षा जास्त रुग्णवाहिका तैनात असणार आहेत. याशिवाय पाण्याची व्यवस्था केली आहेत. तसेच जेवणासह महाप्रसाद म्हणून बुंदी दिली जाणार आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत स्वतंत्रपणे मराठा उमेदवार उतरवायचे की कुणाला पाठिंबा द्यायचा, याची घोषणा जरांगे करतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाने आरक्षणाच्या मुद्द्यावर महायुतीच्या विरोधात बऱ्यापैकी मतदान केले होते. त्याचा फटका राज्यात बसल्याने भाजपला केंद्रात स्वबळावर बहुमत मिळवता आले नाही. आता विधानसभेच्या अनुषंगाने जरांगे काय बोलणार? हे पाहावे लागणार आहे. तर दुसरीकडे, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात भगवान गडावर दसरा मेळावा घेतला जाणार आहे. त्यामुळे बीडमध्ये दोन दसरा मेळावे होणार आहेत. हेही वाचा: Agniveer Yojana : नाशिकमध्ये दोन अग्नीवीरांचा मृत्यू; प्रशिक्षणादरम्यान तोफेचा गोळा फुटल्याने घडली दुर्घटना