मनोज जरांगे यांनी साखळी उपोषण पुढे ढकलले

Manoj Jarange: मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी 15 फेब्रुवारीपासून सुरू होणारे साखळी उपोषण पुढे ढकलले आहे. राज्य सरकारच्या वतीने शिंदे समितीला मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच शिंदे समितीने गॅझेटचा अभ्यास केलेला आहे. त्याचा अभ्यास आता सरकारला करायचा आहे. त्यासाठी सरकारला वेळ द्यावी लागणार आहे. त्यामुळे आता सरकारला पंधरा दिवसांची मुदत आपण देत असल्याचे मनोज जरांगे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.
राज्यभर 15 फेब्रुवारीपासून साखळी उपोषणाची केली होती घोषणा –
मराठा आरक्षण आणि इतर मागण्यांसाठी 15 फेब्रुवारीपासून साखळी उपोषणाचा इशारा मनोज जरांगे यांनी दिला होता. हे उपोषण बेमुदत होणार असून याचे लोण राज्यभर पसरेल असेही ते म्हणाले होते. सरकार जात बघून कारवाई करणार असेल तर ते खपवून घेणार नाही, असा इशारा जरांगे यांनी दिला होता. मात्र, आता हे साखळी उपोषण पुढे ढकलण्यात आले आहे.





